५०० ची नोट असेल तर १०० चे पेट्रोल नाही
By admin | Published: November 10, 2016 12:56 AM2016-11-10T00:56:53+5:302016-11-10T00:56:53+5:30
जीवनावश्यक वस्तू असल्याने मंगळवारी रात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती.
वर्धा : जीवनावश्यक वस्तू असल्याने मंगळवारी रात्रीपासूनच पेट्रोल पंपांवर नागरिकांनी वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. वर्धेतील अनेक पेट्रोलपंपांवर बुधवारी पेट्रोल भरणाऱ्यांची सकाळपासूनच गर्दी दिसून येत होती. ५०० व १००० रुपयांचे चलन वापरातून बाद करण्यात आल्याचा परिणाम वर्धेतील पेट्रोल विक्रीवर दिसून आला. ५०० व १००० नोट सोबत घेऊन घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पेट्रोलपंपांवरही त्रास सहन करावा लागला. अनेक पेट्रोलपंपांवर सुटे पैसे नसल्याने कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी वाहन चालकांना सुटे पैसे नसल्याने ५०० रुपयांचेच पेट्राल टाकण्याचा थेट सल्ला देण्यात धन्यता मानली. परिणामी, अनेक ठिकाणी वाहनचालक व पेट्रालपंप कर्मचारी यांच्यात शाब्दिक चकमकही उडाली. पेट्रालपंपांवर कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी ५०० नोट घेऊन आलेल्या अनेक नागरिकांना १०० रुपयांचे पेट्रोल देण्याचे नाकारत परत पाठविल्याचेही पाहावयास मिळाले.
सुटे नाही, उर्वरित पैसे नंतर नेण्याचाही सल्ला
वर्धा शहरातील वंजारी चौक भागातील पेट्रोलपंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणाजवळ ५०० रुपयांची नोट असल्याचे दिसून आले. सुरूवातीला पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्याने पेट्रोल भरण्यास नकार दिला; पण सदर तरुणाने वाहनातील इंधन पूर्णत: संपल्याचे सांगितल्यानंतर पंपावरील कर्मचाऱ्याने त्याच्या वाहनात पेट्रोलचा भरणा केला; पण ५०० नोट घेत उर्वरित पैसे दुपारी ४ वाजतानंतर घेऊन जाण्याचा सल्लाही दिला.
युवकाची गयावया
शहरातील आरती चौक भागातील पेट्रोलपंपावर ५०० रुपयांच्या नोटीचे सुटे करण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास एक तरुण आला होता. त्याने पेट्रालपंपावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला मला पेट्रोलची गरज नाही, सुट्या पैशांची गरज आहे. दादा, कुणीच ५०० रुपयाचे सुटे पैसे देण्यास तयार नाही आणि मला अतिशय महत्त्वाचे काम आहे. आपण ५०० चिल्लर द्यावी, अशी विनंती केली. सदर युवकाकडे तेवढेच पैसे असल्याने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला तो सुट्या पैशासाठी गयावया करीत होता; पण तब्बल अर्धा ते पाऊन तासापर्यंत त्याला सुटे पैसे देण्यात आले नव्हते.