युवकांना सर्वोदयशी जोडल्यास संजीवनी प्राप्त होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:14 PM2018-02-25T22:14:39+5:302018-02-25T22:14:39+5:30
भारत देश युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यांना विचार दिल्यास योग्य शक्तीचा उपयोग होऊ शकतो.
ऑनलाईन लोकमत
सेवाग्राम : भारत देश युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यांना विचार दिल्यास योग्य शक्तीचा उपयोग होऊ शकतो. याच युवकांना सर्वोदयाशी जोडल्यास संजीवनी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत गांधी विचारवंत व राष्ट्रीय युवा योजनेचे डॉ. एस.एन. सुब्बाराव यांनी व्यक्त केले.
सर्वोदय समाज संमेलनाचा समारोप रविवारी झाला. अध्यक्षस्थानी डॉ. सुब्बाराव तर अतिथी म्हणून न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, राधाबहन भट, जयवंत मठकर, डॉ. उल्हास जाजू आदी उपस्थित होते. डॉ. सुब्बाराव पूढे म्हणाले की, आज हिंसामुक्त भारत पाहिजे. भाषेच्या नावावर विरोध होता कामा नये. आजही देशात भुकेलेल्यांचे प्रमाण ३० कोटी आहे. ग्रामोद्योगाच्या माध्यमातून देशातील रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. पर्यावरण रक्षण व भ्रष्टाचार मुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. न्या. धर्माधिकारी यांनी माणसांचे जीवन निर्भय असावे. निडलेस लाईफ असावी, ग्रीड बेस नसावे. धर्मनिरपेक्ष समाज व्यवस्था असावी. शोषण समाप्त व्हावे. समानता व सर्वांचा आदर झाला पाहिजे, असे सांगितले. डॉ. जाजू यांनी सामाजिक स्तरावरील कामात वैयक्तिकता आणू नये. निष्ठापूर्ण कामात यश मिळते. शरीरात श्वासाचे महत्त्व असते. बुद्धीत अहंकाराला स्थान देता कामा नये. मैत्री सर्वोदयचे हृदय आहे. मतभिन्नता असू शकते; पण मनभिन्नता होऊ देऊ नका, असे सांगितले. याप्रसंगी सर्व स्वयंसेवक व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
शेवटी घोषणापत्राचे वाचन करण्यात आले. यात दारूमुक्त भारत बनविणे, राष्ट्रनिर्माणासाठी अहिंसा मार्ग स्वीकारून युवकांत संजिवनी निर्माण करणे, स्थानिक संसाधनांचा उपयोग आणि रोजगार वाढविणे, महिला शेतकरी, आदिवासी सिस्टम-पासून पिडीत असून निर्भयतेसाठी काम करणे, गणतंत्र व पंचायत राजला अधिक बळकट करणे, गांधीजींच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ग्राम-स्वराज्याला वाढविणे, अंत्योदयाची सुुरुवात करणे, सर्वोदय समाजाला व्यापक बनविणे, जय जगत नारा अधिक प्रभावी व्हावा, मूलभूत मुल्यांवरील संकटांचा सामना करण्यासाठी आम्ही सर्व सर्वोदयी व गांधीजन तत्पर असावे, असे दहा मुद्यांचे वाचन संयोजक आदित्य पटनायक यांनी केले. संचालन गिताजंली पटनायक व महादेव विद्रोही यांनी केले तर आभार डॉ. सुगम बरंठ यांनी मानले. संमेलनात देशभरातील ४५०० सर्वोदयी सहभागी झाले होते.
पारंपरिक नृत्य सादरीकरण
अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्याकरिता देशातील कानाकोपºयातून सर्वोदयी आले होते. सोबतच आसाम, त्रिपूरा येथून काही स्वयंसेवकही आले होते. त्यांनी समारोपीय कार्यक्रमात पारंपरिक लोकनृत्यातून कला, संस्कृतीचे सादरीकरण केले.