लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (श.): आष्टी नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यावर काँग्रेसचे आठ नगरसेवक विजयी झाले होते. त्यांना सत्तास्थापनेसाठी अवघ्या एका नगरसेवकाची गरज होती. दरम्यान, प्रभाग १४ च्या अपक्ष निवडून आलेल्या नगरसेविका सीमा सतपाळ यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करून सर्वांनाच धक्का दिला. सोबतच बसपाच्या नगरसेविकेनेही काँग्रेसला अधिकृत समर्थन दिले आहे. त्यामुळे आता काँग्रेसजवळ १० संख्याबळ झाले आहे.यापूर्वीही आष्टी नगरपंचायतवर काँग्रेसची सत्ता होती. आता यावेळी आठ उमेदवार विजयी झाले होते. एका उमेदवाराचा ईश्वर चिठ्ठीमध्ये पराभव झाल्याने हाती आलेला विजय ऐन शेवटच्या टप्प्यात येऊन थांबला होता. दरम्यान, काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे अपक्ष महिला उमेदवार सीमा सतपाळ यांच्याशी बोलणे सुरू होते. त्यांनी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरण विकासाभिमुख असल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव तथा माजी आमदार अमर काळे यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सर्वांनाच जोरदार धक्का दिला. काल बसपाच्या प्रभाग १६ च्या नगरसेविका अर्चना विघ्ने यांनी विकासासाठी काँग्रेससोबत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. माजी आमदार अमर काळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला.आता काँग्रेसजवळ संख्याबळ १० झाले असून, काँग्रेसकडे पूर्ण संख्याबळ असल्याने सत्तास्थापनेचा त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. येथे दुसऱ्यांदा काॅग्रेस सतास्थापन करणार आहे.
पालकमंत्र्यांनी सत्ता स्थापनेसाठी घेतला पुढाकार- सेलू, समुद्रपूर नगरपंचायतीत त्रिशंकु कौल मतदारांनी सर्वच राजकीय पक्षांना दिला आहे. त्यामुळे येथे सत्ता स्थापनेसाठी मोठी सर्कस करावी लागत आहे. प्रजासत्ताकदिनी पालकमंत्र्यांनी सेलू येथील काँग्रेस विचारधारेच्या विजयी नगरसेवकांशी संवाद साधला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी समिकरण जुळविण्याचे संकेत त्यांनी दिले आहे.
त्यामुळे राजकीय घटनाक्रमांना वेग आला आहे. समुद्रपूर येथेही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, शेतकरी संघटना असे समिकरण जुळवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती आहे.