साचलेल्या पाण्यामुळे रोगराईला आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:11+5:30
आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले. भ्रमणध्वनीवरून सूचित केले. दरम्यान, प्रशासक चौधरी आणि ग्रामसेवक चव्हाण यांनी पाहणी करीत ४ इंचाचे प्लास्टिक पाइप टाकून देतो, असे सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरालगतच्या साटोडा ग्रामपंचायतीअंतर्गत आलोडीतील वॉर्ड क्रमांक सुखकर्तानगर, बुरांडे ले-आउट येथे खुल्या जागेत साचलेल्या पाण्यामुळे आरोग्य धोक्यात आले आहे. याविषयी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही ग्रामसेवकाकडून समस्या सोडविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.
आलोडीतील सुखकर्तानगर येथील खुल्या जागेत मागील चार महिन्यांपासून पाणी साचले असून प्रचंड दुर्गंधी सुटलेली आहे. डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाण्याची विल्हेवाट लावण्याकरिता ग्रामपंचायत व ग्रामविकास अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देण्यात आले. भ्रमणध्वनीवरून सूचित केले. दरम्यान, प्रशासक चौधरी आणि ग्रामसेवक चव्हाण यांनी पाहणी करीत ४ इंचाचे प्लास्टिक पाइप टाकून देतो, असे सांगितले. २ एकराच्या खुल्या जागेतील पाणी प्लास्टिक पाइपमधून निघणार नसल्याचे नागरिकांनी प्रशासक आणि ग्रामसेवकाच्या निदर्शनास आणून दिले. यानंतर नागरिकांनी लोकवर्गणीतून १ फूट डायमीटरचे सिमेंट पाइप आणून दिले. मात्र, ग्रामसेवकाने आडमुठे धोरण अवलंबवित पाइप टाकण्यास टाळाटाळ केली. सिमेट पाइपमधून जात असलेले पाणी पुढे काढण्याकरिता शासकीय जागेतून नाली खोदकामाची मागणी केली. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाची अनास्था कायम आहे. यामुळे ४० ते ५० घरांच्या आरोग्याचा प्रश्न चव्हाटयावर आला आहे.
सुखकर्तानगरात मूलभूत सुविधांचा प्रचंड दुष्काळ आहे. नाल्यांची नियमित स्वच्छता आणि खुल्या जागेतील पाण्याची विल्हेवाट लावली जात नाही. परिणामी, नागरिकांच्या घरात पाणी शिरते. मात्र, ग्रामपंचायतीकडून कायम दुर्लक्ष केले जात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे यापुढे गृह व इतर कर न भरण्याचा नागरिकांनी पवित्रा घेतला आहे.
ग्रामसेवक, प्रशासकाच्या अनागोदी कारभाराची चौकशी करीत साचलेल्या पाण्याची तातडीने विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर सुधा सहारे, मनीषा डाखोरे, विनोद ठिकरे, राजेश गारोडे, गजानन कुंभारे, किशोर चरडे, प्रवीण गंगासागर, रवी कापरे यांच्यासह २६ नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत.
साटोडयाचे प्रशासक बेपत्ता
साटोडा ग्रामपंचायतीची मुदत संपली असून ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र, प्रशासक चौधरी आठ ते दहा दिवसांपासून बेपत्ता असून भ्रमणध्वनीही बंद असल्याने कामाचा खोळंबा झालेला आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे.