लोखंडी शिडी कोसळल्या; चिमुकले बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:23 AM2018-03-09T00:23:14+5:302018-03-09T00:23:14+5:30
येथील लोक शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित लोक महाविद्यालयाच्या मैदानावर कृषी विभागाची १० मार्चपासून कृषी प्रदर्शन आयोजित आहे. या प्रदर्शनाकरिता मोठा मंडप उभारणे सुरू असतानाच गुरुवारी सकाळी दोन मोठ्या लोखंडी शिडी कोसळल्या.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : येथील लोक शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित लोक महाविद्यालयाच्या मैदानावर कृषी विभागाची १० मार्चपासून कृषी प्रदर्शन आयोजित आहे. या प्रदर्शनाकरिता मोठा मंडप उभारणे सुरू असतानाच गुरुवारी सकाळी दोन मोठ्या लोखंडी शिडी कोसळल्या. यावेळी मैदानात तुकडोजी महाविद्यालयातील चिमुकली मुले खेळत होती. दरम्यान लक्ष जाताच मुले पळाल्याने कोणतीही घटना घडली नाही. या शिडीकडे काम करणाºयांचे दुर्लक्ष झाल्याने मोठी घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संदर्भात वॉर्ड क्रं.९ येथील नगरसेविका तथा माजी शिक्षण सभापती श्रेया श्रीधर देशमुख यांनी नगराध्यक्षांना तक्रार केली आहे. हा प्रकार मैदानावर खेळत असलेल्या चिमुकल्यांच्या जीवावर उठणारा असल्याची तक्रार त्यांच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाने केली आहे. येथे होत असलेल्या या प्रदर्शनासंदर्भात पालिकेने आयोजकांना योग्य सूचना देवून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या मैदानावर तुकडोजी महाराज विद्यालयाच्या चिमुकल्यांसह अनेक युवक खेळण्यासाठी येतात. येथे प्रदर्शनानिमित्त सुरू असलेल्या कामात अनेकवेळा लोखंडी सिड्या पडल्याच्या घटना आहेत. या परिसरातील तब्बल ११ रस्ते या मैदानावर मिळत असल्याने चोहोबाजूंनी दुचाकी चालकांचेही अवागमन सुरू असते. सकाळच्यावेळी घडलेल्या या प्रकारामुळे एखादा दुचाकी चालक जखमी झाला असता, तर त्याची जबाबदारी कुणावर असती असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
आयोजकांकडून सुरक्षेसंदर्भात दुर्लक्ष
लोक शिक्षण प्रसारक मंडळाच्या मैदानावर सुरू असलेल्या या मोठ्या मंडपाच्या कामादरम्यान सुरक्षेसंदर्भात आयोजकांचे दुर्लक्ष होत आहे. आज सकाळी लोखंडी नट तुटून या शिड्या कोसळल्या. ही घटना घडली. त्यावेळी मंडपासमोर आणि त्या शिड्यांवर कोणताही कारागिरी नसल्याने धोका उद्भवला नाही. कृषी विभागाने या संदर्भात लक्ष देवून सुरक्षा करावी अशी मागणी श्रेया देशमुख यांनी केली.
मैदान भाड्याने दिल्यास शिक्षण संस्थेला मोठे भांडवल उपलब्ध होते. त्यामुळे या मैदानावर अनेकवेळा मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र आयोजनानंतर परिसरात निर्माण झालेल्या इतर समस्या सोडविण्याकडे आयोजक तथा मैदान भाड्याने देणारी संस्था यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही नगरसेविका श्रेया देशमुख यांनी केला.