जावईबापूंचा पहिला दसरा पाच हजारांत; सोने 48 हजारांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 05:00 AM2021-10-15T05:00:00+5:302021-10-15T05:00:15+5:30
लॉकडाऊननंतर मार्केट पूर्वपदावर येताच सोन्याला मागणी वाढली आहे. गुंतवणूकदारांना सोने व चांदीव्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. सोने ४८ हजारांवर पोहोचले असून दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात दागिने खरेदीसाठी गर्दी उसळली असून दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव हा ५० हजारावर पोहोचण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. एकंदरीत सराफा बाजारात झळाळी असल्याचे चित्र आहे.
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणाच्या शुभमुहूर्तावर गुरुवारी मंदीच्या सावटाखाली असलेल्या बाजारपेठेला दसऱ्यानिमित्त झळाळी आली होती. ग्राहकांनी आवश्यक वस्तूंसह दागिन्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. पहिल्या दसरा सणानिमित्त जावाईबापूंना सोन्याचे पान देण्याची परंपरा असून, यंदा पाच हजारांत सोन्याचे पान द्यावे लागणार आहे.
ग्राहकांनी आवश्यक वस्तू आणि दागिन्यांची मोठ्याप्रमाणात खरेदी केली असून या दिवशी मुख्यत्वे सराफा, ऑटोमोबाईल आणि इलेक्ट्राॅनिक्स बाजारपेठेंमध्ये जवळपास कोटी रुपयांची उलाढाल होणार आहे. यावर्षी बाजारात ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह होता.
लॉकडाऊननंतर मार्केट पूर्वपदावर येताच सोन्याला मागणी वाढली आहे. गुंतवणूकदारांना सोने व चांदीव्यतिरिक्त अन्य पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सराफ बाजारातील परिस्थिती वेगाने बदलत आहे. सोने ४८ हजारांवर पोहोचले असून दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात दागिने खरेदीसाठी गर्दी उसळली असून दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव हा ५० हजारावर पोहोचण्याची शक्यता सराफा व्यावसायिकांनी वर्तविली आहे. एकंदरीत सराफा बाजारात झळाळी असल्याचे चित्र आहे. सध्या इलेक्ट्राॅनिक मार्केटमध्येही कमालीची गर्दी पहावयास मिळत असून सण उत्सवळ काळात इलेक्ट्रीक साहित्य खरेदीलाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
सोने बाजारात धूम
दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात गर्दी उसळल्याने सराफा बाजाराला झळाळी आली आहे. अनेकांनी लग्नसराईनिमित्त दागिन्यांची बुकिंग देखील केल्याची माहिती सराफा व्यावसायिकाने दिली आहे. दिवाळीपर्यंत आणखी बाजाराला झळाळी येणार असून सोनं खरेदीसाठी नागरिक गर्दी करू लागल्याचे चित्र बाजारात पाहावयास मिळत आहे.
अर्ध्या ग्रॅमचे पान २७००, तर एक ग्रॅमचे ५ हजारात
पहिल्या दसऱ्याला जावईबापूला सोन्याचे पान देण्याची परंपरा वर्षानुवर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे सोनं खरेदी करण्यासाठी महिलांची गर्दी उसळली आहे. अर्ध्या ग्रॅम सोन्याचे पान २ हजार ७०० रुपयांपर्यंत, तर एक ग्रॅमच्या सोन्याच्या पानाची किंमत ५ हजार १०० पर्यंत गेली असल्याने यंदा जावईबापूचा दसरा पाच हजारांत जाणार आहे.
महिनाभरात २००० रुपयांनी वाढले भाव
- कोरोनामुळे सराफा व्यवसायावर मंदीचे सावट निर्माण झाले होते. मात्र, अनलॉक होताच बाजारपेठ हळूहळू पूर्वपदावर आली आहे.
- ३० सप्टेंबर रोजी सोन्याचा दर ४६ हजारांवर होता. मात्र, अवघ्या १४ दिवसांतच हा दर तब्बल ४८ हजारांवर गेला असून, या १४ दिवसांत २ हजार रुपयांनी सोन्याचे भाव वाढले असून येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव ५० हजारी गाठण्याची शक्यता आहे.
सराफा बाजाराला झळाळी...
दसऱ्यानिमित्त सराफा बाजारात चांगलीच झळाळी आलेली आहे. अनेकांनी लग्नसराईनिमित्ताने आतापासूनच दागिन्यांचे बुकिंगही केलेले आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ५० हजारावर जाण्याची शक्यता असून सोनं खरेदीसाठी महिलावर्गांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- सौरभ ढोमणे, सराफा व्यावसायिक वर्धा.