बालकांना देणार वन्यजीव संरक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 10:23 PM2018-08-18T22:23:39+5:302018-08-18T22:25:06+5:30
आजचा विद्यार्थी उद्याच्या विकसित भारताचा नागरिक असून मुला-मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच वन्यजीव व वृक्षांबाबत आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय यंत्रणा विविध उपक्रम राबविते. बालमनांना वृक्षासह वन्यजीव संरक्षणाचे धडे मिळावे या हेतूने जिल्ह्यातील चार ठिकाणी विशेष केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २७.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आजचा विद्यार्थी उद्याच्या विकसित भारताचा नागरिक असून मुला-मुलींमध्ये विद्यार्थी दशेतच वन्यजीव व वृक्षांबाबत आवड निर्माण व्हावी या उद्देशाने शासकीय यंत्रणा विविध उपक्रम राबविते. बालमनांना वृक्षासह वन्यजीव संरक्षणाचे धडे मिळावे या हेतूने जिल्ह्यातील चार ठिकाणी विशेष केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे २७.५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव संबंधितांना पाठविण्यात आला आहे.
खेळता-खेळता मुला-मुलींना विविध वन्यप्राणी तसेच विविध प्रजातींच्या वृक्षांची माहिती मिळावी या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून वर्धा तालुक्यातील सेलूकाटे, पवनार, देवळी तालुक्यातील गुंजखेडा व आर्वी तालुक्यातील सारंगपुरी येथे वन विभागाच्या पुढाकारातून इको टुरिझम केंद्र तयार करण्यात येणार आहे. सदर चारही केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून पवनार येथील केंद्रासाठी ३ कोटी, सेलूकाटे येथील केंद्रासाठी १० कोटी, गुंजखेडा येथील केंद्रासाठी ९ कोटी तर सारंगपुरी येथील केंद्रासाठी ५.५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत असल्याचा अंदाज वन विभागाकडून वर्तविला जात आहे.
या विशेष केंद्राच्या माध्यमातून निसर्गाची ओळखच मुला-मुलींना होणार आहे. विशेष करून सदर केंद्र एकूण सहा ठिकाणी करण्याचे पुर्वी निश्चित करण्यात आले होते. परंतु, अंतिम टप्प्यात चार ठिकाण निश्चित करून त्याबाबतचा डीपीआर इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डला पाठविण्यात आला. त्या डिपीआरला मंजुरीही मिळाली आहे.
सध्या सदर चारही केंद्राचा विषय अंदाजपत्रकाला मंजुरी मिळण्याच्या स्तरावर प्रलंबित आहे. त्याला तात्काळ हिरवी झेंडी देत प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाल्यास हे केंद्र वर्धेकरांसाठी फायद्याचे ठरणार आहे.
सेवाग्राम विकास आराखड्यातून साकारणार पवनारचे केंद्र
सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून वर्धा शहरासह परिसरात अनेक विकास कामे केली जात आहेत. याच विकास आराखड्यातून वर्धा शहराशेजारच्या पवनार येथील निसर्ग ओळख केंद्र विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे ३ कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या केंद्रात वन्य प्राण्यांसंदर्भात आवश्यक माहिती राहणार आहे. शिवाय औषधी वनस्पतीचीही माहिती भेट देणाऱ्यांना उपलब्ध होणार आहे.
सेलूकाटेमध्ये पाण्याच्या समस्येने वाढविली अडचण
वर्धा तालुक्यातील सेलूकाटे येथे तयार करण्यात येणाऱ्या विशेष केंद्रासाठी १० कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचा अंदाज आहे. असे असले तरी तेथे पाण्याची समस्या निर्माण झाल्याने वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. या समस्येवर लवकरच मात करण्यात येईल, अशा विश्वास वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
अंदाजपत्रकाला हिरवी झेंडी मिळताच कार्यवाही
सदर चारही केंद्राचा डिपीआर तयार करून तो येथील उपवनसंरक्षक कार्यालयाने संबंधितांना पाठविला. त्या डिपीआरला इको टुरिझम डेव्हलपमेंट बोर्डने मंजुरी दिली आहे. त्यानंतर वन विभागाने अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले. मात्र, ते अंदाजपत्रक सध्या त्याच्याकडे धुळखात आहे. अंदाजपत्रकाला हिरवी झेंडी मिळताच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार असल्याचे सांगण्यात आले.
बोटिंगचा आनंद लुटला येणार
जिल्ह्यात पवनार, सेलूकाटे, गुंजखेडा, सारंगपुरी, बोर व ढगा येथे निसर्ग ओळख केंद्र तयार करण्याचे पूर्वी निश्चित करण्यात आले होते. परंतु, या विषयाला अंतिम स्वरूप देताना बोर व ढगा हे ठिकाण वगळण्यात आले. सदर चारही ठिकाणी प्रामुख्याने साहसी खेळ, बच्चेकंपनीसाठी बगीचा, वन उद्यान, मचांग आदी तयार करण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी बोटींगची व्यवस्थाही करण्यात येणार असल्याने नागरिकांना त्याचा आनंद लुटला येणार आहे.