१८ खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 05:00 AM2020-09-16T05:00:00+5:302020-09-16T05:00:12+5:30
खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत जास्त युरिया खत खरेदी केलेल्या २० शेतकऱ्यांची व त्यांना विक्री केलेल्या कृषी केंद्राची तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यानंतर ही माहिती चौकशीकरिता कृषी विभागाला देण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नियमबाह्य खत विक्री केल्याचा ठपका ठेऊन कृषी विभागाने तब्बल १८ कृषी केंद्र व्यावसायिकांचे खत विक्रीचे परवाने निलंबित केले आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीच्या आधारे चौकशी करून दोषी आढळलेल्या कृषी केंद्र व्यावसायिकांवर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, केंद्र शासनाच्या सुचनेनुसार रासायनिक खतांची विक्री पॉस मशिनद्वारे शेतकऱ्यांना करणे क्रमप्राप्त आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केल्याचे लक्षात येताच चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला केंद्र शासनाकडून प्राप्त झाल्या. खरीप हंगाम २०२०-२१ मध्ये एप्रिल ते जुलै या कालावधीत जास्त युरिया खत खरेदी केलेल्या २० शेतकऱ्यांची व त्यांना विक्री केलेल्या कृषी केंद्राची तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या. त्यानंतर ही माहिती चौकशीकरिता कृषी विभागाला देण्यात आली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्या मार्गदर्शनात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
चौकशीदरम्यान डेकाटे कृषी केंद्र करंजी (भोगे), लक्ष्मी कृषी प्रतिष्ठान, सेवाग्राम, अरूण सिडस् अॅण्ड पेस्टीसाईड वर्धा, किसान अॅग्रो कृषी केंद्र पुलगाव, वैशाली कृषी केंद्र, सेलू, पराग कृषी केंद्र, सेलू, पंकज कृषी केंद्र हमदापूर, बलदेव कृषी केंद्र, अल्लीपूर, साखरकर कृषी केंद्र, काचनगाव, आदर्श कृषी केंद्र पवनी, भोजाजी कृषी केंद्र, आर्वी छोटी, अमोल कृषी केंद्र वडनेर, हरिओम अॅग्रो ट्रेडर्स, हिंगणघाट, श्रीनाथ कृषी केंद्र, हिंगणघाट, शुभम कृषी केंद्र, हिंगणघाट, शुभम कृषी केंद्र समुद्रपूर, बाभुळकर कृषी केंद्र, समुद्रपूर, जैन कृषी केंद्र, समुद्रपूर, गौळकर कृषी केंद्र, गिरड हे दोषी आढळल्याने सुरूवातीला त्यांना नोटीस बजावून जनसुनावणी घेण्यात आली. कृषी केंद्र व्यावसायिकांची बाजू जाणून घेतल्यावर त्यांचे खत विक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
एकाच शेतकऱ्याच्या नावाने पॉस मशीनद्वारे जादा खताची केली विक्री
उपविभागीय कृषी अधिकारी यांनी शासनाकडील प्राप्त यादीनुसार कृषी केंद्राची तपासणी केली असता केंद्र शासनाच्या सुचनेनुसार कृषी केंद्रांनी प्रत्येक शेतकºयाला खत विक्री करताना ती पॉस मशिनद्वारे करणे अनिवार्य असताना संबंधीत कृषी केंद्राने एकाच शेतकऱ्याचे नाव आणि
आधार कार्डचा वापर करून युरियाची विक्री केली. परंतु प्रत्यक्षात हे खत इतर शेतकऱ्यांना विक्री करून अनियमितता केल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाले आहे.
सहा महिन्यांपर्यंत करता येणार नाही खत विक्री
परवाना निलंबित करण्यात आलेल्या १८ कृषी केंद्र व्यावसायिकांना पुढील सहा महिन्यांपर्यंत खताची विक्री करता येणार नाही, असे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरही कृषी विभाग लक्ष ठेवणार आहे.