लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : इंग्रजांच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रक्तरंजित क्रांती झाली. या रक्तरंजित क्रांतीमधून देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला आपापले अधिकार मिळून जगता यावे म्हणून काँग्रेसने आपल्या राजवटीत प्राधान्य दिले. नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणून सातत्याने देशाला शिखरावर पोहोचविण्याचे कार्य केले. परंतु आजची परिस्थिती फार भयावह आहे. केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांनी देशावर कुठल्याही प्रकारचे प्रेम केले नाही. उलट तेच आज देश विकायला निघाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘प्रारंभ... स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा’ अंतर्गत आष्टीमध्ये ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, दुग्धविकास क्रीडामंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विनायक देशमुख, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्र्रकांत हंडोरे, माजी मंत्री अशोक शिंदे, आमदार रणजित कांबळे, आयोजक माजी आमदार अमर काळे, नाना गावंडे, शेखर शेंडे, अतुल लोंढे, बाळ कुळकर्णी आदी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी अतिथींचे आष्टीच्या शहीद स्मारकावर आगमन झाले. सर्व मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळी सर्व मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली तसेच या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने माणसाला माणसासारखे जगता यावं असा संदेश दिला. त्याग आणि बलिदानातून मिळालेले सरकार विरोधी पक्ष बुडवायला निघाले आहे. लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडविला जात आहे. त्यामुळे काँग्रेसने प्रचंड मेहनत घेऊन लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही आज केंद्र सरकारच्या हुकुमशाही पद्धतीमुळे प्रचंड अडचणीत आली आहे. त्याला वाचविण्याची खºया अर्थाने गरज आहे, त्यासाठी एकदिलाने पुढे या, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले. माजी आमदार अमर काळे यांनी प्रास्ताविकातून १९४२ च्या स्वातंत्र लढ्यातील इतिहास कथन केला. पारतंत्र्याच्या काळात तुटलेल्या देशाला बळकटीवर उभारणी देण्याचे काम काँग्रेसनेच केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहीदांच्या वारसांचा मान्यवर अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवंदना व राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी : पालकमंत्री- शेतकरी हक्कासाठी जेव्हा लढा देतो. तेव्हा काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी पाठीशी उभा राहतो. गेल्या वर्षभरापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने साधी दखलही घेतली नाही. ही लोकशाही मार्गाने जाणारी वाटचाल तात्काळ रोखायला हवी, असे मत पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.
- याप्रसंगी विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्राणाची आहुती देणाºयांचा हा देश असून आज लोकशाहीची विरोधकांकडून अवहेलना होत आहे. राज्यघटना पायदळी तुडवून देश नामशेष करण्याचा विरोधकांचा डाव सुरू असल्याचे सांगितले. यावेळी माजी मंत्री चंद्र्रकांत हंडोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विनायक देशमुख यांनी ही मार्गदर्शन केले.