पुरूषोत्तम नागपुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा आणि अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर वसलेला अप्पर वर्धा प्रकल्प दोन्ही जिल्ह्यांकरिता वरदान ठरला आहे. येथील उद्यानाला विकसित करून पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यासंदर्भात आराखडा तयार करून मंत्रालयात सादर केला. पण, आता २९ वर्षांचा काळ लोटला तरीही ही फाईल धूळखात पडून असल्याने ‘शासकीय काम २९ वर्षे थांब’, असा दफ्तरदिरंगाईचा अनुभव दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना आला आहे.अप्पर वर्धा प्रकल्पाचा अर्धा भाग आर्वी विधानसभा तर अर्धा भाग मोर्शी विधानसभा क्षेत्रात येत असून हे दोन्ही विधानसभा क्षेत्र वर्धा लोकसभा क्षेत्राचा भाग आहेत.
अप्पर वर्धा धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी असते, त्यामुळे १९९१ मध्ये नागपूर जिल्ह्यातील नवेगाव खैरी येथील पेंच प्रकल्प व वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेले अप्पर वर्धा धरण स्थळाला पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने समिती गठित केली होती. त्यानुसार विकास आराखडा तयार करून आॅगस्ट १९९१-९२ मध्ये तत्कालीन पालकमंत्र्यांनी अप्पर वर्धा धरणाच्या तीरावरील प्रस्तावित उद्यानाच्या जागेची पाहणी केली. सोबतच राज्यातील खासगी वास्तुशास्त्र-डिझायनर व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अप्पर वर्धा धरणाच्या विश्रामगृहात चर्चा झाली. त्यानंतर हा आराखडा मंजुरीकरिता मंत्रालयाकडे पाठविण्यात आला. याला आता २९ वर्षांचा काळ लोटला तरीही मंजुरी मिळाली नसून धूळखात पडला आहे. त्यामुळे येथील सुविधेअभावी पर्यटकांमध्ये नाराजीचा दिसून येत आहे. पर्यटन विकासाला चालना देण्याकरिता या आराखड्याला मंजुरी देऊन विकास साधण्याची मागणी होत आहे.
आराखड्यात या गोष्टींचा होता समावेशउद्यानासाठी प्रकल्पाच्या उजव्या बाजूला ४५.७८ हेक्टर जमीन व डाव्या बाजूला ३८.८८ हेक्टर जमीन प्रस्तावित केली होती. या जमिनीवर बालोद्यान, धबधबा, वसतिगृह, उपाहारगृहे, दुकाने, लॉगहॅट, मॉडेल्स, तंबू वसाहत, रस्ते, पायवाटा, प्राणी व पक्षी, मत्स्य संग्रहालय, रोपटे, पवनचक्की, जलक्रीडा अंतर्गत वॉटर पार्क, निसर्ग उपचार केंद्र, योग केंद्र आणि पोलिस चौकी प्रस्तावित होती.
अप्पर वर्धा उद्यान योजना ही पूर्णत: धूळखात पडली असून शासनाने काही प्रमाणात येथे उद्यान योजनेकरिता केलेला खर्च व्यर्थ जात आहे. शासनाने नियोजनाप्रमाणे या उद्यानावर पूर्ण खर्च करून पर्यटन विकासाला चालना देवून देत सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- दादाराव केचे, आमदार, आर्वी विधानसभा क्षेत्र