तळेगाव (श्या.पं.) : शहरासह गावातील प्रत्येक घरी नोकरापासून सालदारापर्यंत मोबाईल पोहोचला आहे. याचा फायदा घेत सिमकार्ड कंपन्या ग्राहकांना विविध योजनांची भूरळ घालून गंडवित असल्याचे दिसते. मागणी नसताना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा मोबाईल धारकांना त्रस्त करीत असल्याचे दिसते.आधुनिक काळात मोबाईल जीव की प्राण झाला आहे. प्रत्येकाच्या हाती मोबाईल दिसतो. एकाच घरात तीन -चार मोबाईल दिसून येतात. ही संधी साधून ग्राहकांची मागणी नसताना विविध सिम कंपन्यांकडून ग्राहकांना विविध सेवा पुरविल्या जातात. त्यासाठी ग्राहकांची परवानगी घेतली जात नाही. मागणी नसताना पुरविल्या जाणाऱ्या या सुविधांमुळे ग्राहक संभ्रमात आहेत. सिमकार्ड कंपन्यांकडून मागणी नसताना लादण्यात आलेल्या विविध सेवांचा भार ग्राहकांच्या खिशाला सोसावा लागत आहे. मोबाई धारकांना सेवा पुरविणाऱ्या सिमकार्ड कंपन्यांनी विविध योजनांचे आमिष दाखवून ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा सपाटा सुरू केला आहे. एखाद्या योजनेच्या लोभात पडून ग्राहक संबंधित कंपनीची सेवा घेतात; पण देयक अधिक आले की फसल्याची भावना निर्माण होते. अनेकदा मोबाईलमधून पैसे कापले जातात. अशा सेवा पुरविणाऱ्या काही कंपन्या ग्राहकांच्या मोबाईलवर आपल्याच मर्जीने अनेक सुविधा सुरू करतात. ग्राहकांची परवानगी न घेता आपल्याकडील उपलब्ध सेवा यांना बहाल करतात. या सेवांमध्ये डायलर टोन व विविध मेसेजची सुविधा तर ग्राहकाला कल्पना न देताच सुरू केल्या जातात. सोबतच राशी भविष्य, संगीत, क्रिकेट स्कोअर, इंटरनेट आदी सुविधा पुरविल्या जातात. पुर्वसूचना न देता सुरू होणाऱ्या या सेवा सध्या डोकेदुखी ठरत आहे.(वार्ताहर)
सीम कंपन्यांची मोबाईलधारकांना भुरळ
By admin | Published: May 24, 2015 2:32 AM