आरोग्याची खबरदारी घेत सोमवारी शाळांची घंटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 05:00 AM2020-11-20T05:00:00+5:302020-11-20T05:00:10+5:30
जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांच्या कोविड चाचणीकरिता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून कोविड चाचणी सुरु झाली असून २२ नोव्हेंबरपर्यंत ९ ते १२ वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य शासनाने ‘अनलॉक’ नंतर २३ नोव्हेंबरपासून इयत्ता ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आरोग्य विषयक खबरदारी घेण्याचे निर्देश दिले असून शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता कोविड चाचणी करण्याकरिता शिक्षकांची गर्दी उसळली आहे.
जिल्ह्यात ९ ते १२ पर्यंतच्या एकूण ३५८ शाळा असून २ हजार २०० शिक्षक तर १ हजार १०० शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहे. शिक्षकांच्या कोविड चाचणीकरिता तालुका स्तरावर ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. १७ नोव्हेंबरपासून कोविड चाचणी सुरु झाली असून २२ नोव्हेंबरपर्यंत ९ ते १२ वीच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षकांना प्रथम अॅन्टिजेन आणि आवश्यकता असल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्याचा पर्याय दिला आहे.
या शाळांमध्ये तब्बल ७० हजार विद्यार्थी असून आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जाणार आहेत. तसेच शाळांमध्ये शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उपाययोजना करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. शाळांमधील सोयी-सुविधांचा तसेच शाळा व्यवस्थापन समितीचा आढावा शिक्षण विभागाकडून घेतला जात आहे. यासर्व खबरदारी घेऊनच सुरक्षित वातावरणात सोमवारपासून शाळा सुरु करायच्या आहेत. पालकांनी भीती न बाळगता पाल्यांना शाळेत पाठवावे. सोबतच मुख्याध्यापकांनी सूचनाचे पालन करावे, असे शिक्षणाधिकारी डॅा. मंगेश घोगरे यांनी सांगितले आहे.
तर ऑनलाईन वर्ग घेतला जाणार नाही
शाळा व्यवस्थापन समितीला पालकांकडून संमतीपत्र घ्यावयाचे आहे. जर काही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास परवानगी दिली नाही आणि वर्गात ५० टक्केच्यावर विद्यार्थी उपस्थित असल्यास ऑफलाईन वर्ग घेतला जाईल. अनुपस्थित विद्यार्थ्यांकरिता परत ऑनलाईन वर्ग घेतला जाणार नाहीत.
शिक्षकांची चार तास उपस्थिती अनिवार्य
शासन निर्णयानुसार शाळेत १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य असून कोणता वर्ग ऑनलाईन व कोणता ऑफलाईन घ्यावा, हा निर्णय मुख्याध्यापकाचा राहणार आहे. ऑनलाईन वर्ग घ्यावयाचा असल्यास शिक्षकाला शाळेत येण्याची आवश्यकता राहणार नाही. शाळेत शिक्षकांची कमीत कमी चार तास उपस्थिती अनिवार्य आहे. या कोविड काळात शिक्षकाचे अध्यापन झाल्यानंतर मुख्याध्यापक किंवा शाळा प्रशासनास इतर कामकाज नसल्यास घरी जाता येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद केले आहे.