मोर्शी, हिंगणघाट भाजपसाठी, तर धामणगाव, देवळी काँग्रेसकरिता निर्णायक; भाजपचा जुनाच तर महाविकास आघाडी देणार नवा मोहरा
By रवींद्र चांदेकर | Published: March 26, 2024 04:13 PM2024-03-26T16:13:51+5:302024-03-26T16:14:21+5:30
रवींद्र चांदेकर वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट आणि आर्वी, तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व ...
रवींद्र चांदेकर
वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघात जिल्ह्यातील वर्धा, देवळी, हिंगणघाट आणि आर्वी, तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व धामणगाव विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. यात गेल्यावेळी भाजप उमेदवाराला मोर्शी आणि हिंगणघाट विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. त्या तुलनेत धामणगाव आणि देवळ मतदार संघात सर्वात कमी मताधिक्य होते. त्यामुळे यंदा भाजप उमेदवारासाठी मोर्शी आणि हिंगणघाट, तर महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी धामणगाव आणि देवळी विधानसभा मतदार संघ निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
२०१९ च्या निवडणुकीत वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रामदास तडस यांना पाच लाख ७८ हजार ३६४, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी आणि काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस यांना तीन लाख ९१ हजार १७३ मते मिळाली होती. या दोघांमधील मतांमध्ये एक लाख ८७ हजार १९१ मतांचा फरक होता. त्यावेळी तडस यांना मोर्शी विधानसभा मतदार संघात जवळपास एक लाख सहा हजारांच्यावर, तर टेकास यांना ५७ हजारांच्यावर मत मिळाली होती. तडस यांना तब्बल ४८ हजारांच्यावर मताधिक्य होते. हिंगण्घाट विधानसभेत तडस यांना एक लाख तीन हजारांच्यावर, तर टोकस यांना ६५ हजरांच्यावर मते मिळाली होती. या मतदार संघात तडस यांना जवळपास ३८ हजारांच्यावर मताधिक्य मिळाले होते.
याउलट, तडस यांचा गृह मतदार संघ असलेल्या देवळी विधानसभेत त्यांना ८५ हजरांच्यावर, तर टोकस यांना ६८ हजारांच्यावर मते प्राप्त झाली होती. या मतदार संघात तडस यांना केवळ १६ हजारांवर मताधिक्य होते. धामणगाव विधानसभेत तडस यांना ९४ हजारांवर, तर टोकस यांना ७५ हजारांवर मते मिळाली होती. या मतदार संघातही तडस यांना केवळ १८ हजारांवर मताधिक्य होते. उर्वरित आर्वी विधानसभेत २६ हजारांवर आणि वर्धा विधानसभेत ३७ हजारांवर मताधिक्य होते. त्यावेळी सर्व सहाही विधानसभेत रामदास तडस यांना आघाडी घेतली होती.
विजयातील तफावत घटली
२०१४ मध्ये भाजप आणि काँग्रेसच्या विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये दोन लाख १५ हजार ७८३ मतांचा फरक होता. हाच फरक २०१९ च्या निवडणुकीत जवळपास २८ हजार मतांनी कमी होऊन एक लाख ८७ हजार १९१ वर आला होता. गेल्या दोन निवडणुकीत जय आणि पराजयामधील मतांचे अंतर कमी झाले. आता हा फरक विरोधक मोडीत काढणार का, असा प्रश्न आहे.
‘महाविकास’मध्ये कलगीतुरा सुरूच
भाजपने रामदास तडस यांच्या रुपाने जुनाच चेहरा पुन्हा एकदा मैदानात उतरविला आहे. मात्र, महाविकास आघाडीने अद्याप उमेदवाराची घाेषणा केली नाही. आघाडीत हा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुटल्याचे सांगितले जाते. या पक्षाकडून काँग्रेसचे आर्वीचे माजी आमदार अमर काळे रिंगणात उतरणार असल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, खुद्द काँग्रेसमध्ये काळे यांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अर्ज दाखल करण्याची वेळ एक दिवसावर येऊन ठेपली असताना महाविकास आघाडीत कलगीतुरा सुरूच आहे.