देवळी : केवळ रस्त्यांची निर्मिती झाली म्हणजे विकास वा सुविधा होत नाही़ याची प्रचिती सध्या पुलगाव-वर्धा चौरस्त्यावर येत आहे़ येथे गतिरोधक निर्माण करण्यात आले नसून प्रवासी निवाराही बांधण्यात आलेला नाही़ यामुळे प्रवाशांना ताटकळावे लागते़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ अनेक प्रकारच्या सुविधांअभावी शहरातील पुलगाव-वर्धा चौरस्ता समस्यांचे माहेरघर बनला आहे़ शिवाय जीवघेण्या अपघातास कारणीभूत ठरत आहे़ बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अनेकांना अपघातग्रस्त व्हावे लागत आहे़ या चौरस्त्यावर गतिरोधक तयार करण्यात आलेले नाही़ यामुळे वाहनांची सुसाट वर्दळ असते़ निवार्याची व्यवस्था करण्यात आली नाही़ यामुळे शाळकरी विद्यार्थी, महिला कर्मचारी व वृद्धांना उन्हामध्ये उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते़ याबाबत जिल्हाधिकारी व बांधकाम विभागाला वारंवार तक्रारी करण्यात आल्यात; पण अद्यापही दखल घेण्यात आली नसल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण फटिंग यांनी व्यक्त केली़ नागपूरहून देवळी मार्गे येणार्या बर्याच बसेस बसस्थानकावर न जाता परस्पर पुलगावला जातात़ या चौरस्त्यावर थांबतात़ यामुळे प्रवाशांची येथे मोठी गर्दी होते़ यात विद्यार्थी, महिला, कर्मचारी व वृद्धांचा भरणा असतो़ बांधकाम विभागाच्यावतीने या चौरस्त्यावर गतिरोधक तयार करण्यात आले नाही़ शिवाय मार्गदर्शक रंगित पट्टेही मारण्यात आले नाही़ यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होते़ रंगित पट्टे नसल्याने रस्ता ओलांडत असताना अनेक अपघात होताहेत़ निवारा नसल्याने तप्त उन्हात वा एका कोपर्यात झाडाच्या सावलीत उभे राहावे लागते़ या चौरस्त्यावर रात्री १२ वाजेपर्यंत वर्दळ राहत असल्याने असामाजिक तत्व व व्यसनाधिन युवकांचाही त्रास असल्याचे प्रवाशांद्वारे सांगितले जाते़ याबाबत आगार प्रमुख व पोलीस ठाण्यात सूचना देण्यात आली; पण अद्याप पोलीस गस्तही वाढविण्यात आली नाही़ शिवाय प्रवासी निवार्याची निर्मितीही करण्यात आलेली नाही़ बांधकाम विभाग, परिवहन महामंडळ व पोलिसांनी याकडे लक्ष देत प्रवाशांना सुविधा व सुरक्षा पुरविणे गरजेचे झाले आहे़(प्रतिनिधी)
सुविधांअभावी चौरस्ता समस्यांचे आगार
By admin | Published: May 11, 2014 12:35 AM