पालिकेचा कारभार वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:19 PM2018-02-25T22:19:20+5:302018-02-25T22:19:20+5:30
अनेक कारणांनी येथील नगर परिषद प्रशासन वादात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची सततची गैरहजेरी आणि त्यांचा भ्रमणध्वनीवर असलेली नॉट रिचेबलची टेप नागरिकांना त्रास देणारी ठरत आहे.
ऑनलाईन लोकमत
देवळी : अनेक कारणांनी येथील नगर परिषद प्रशासन वादात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची सततची गैरहजेरी आणि त्यांचा भ्रमणध्वनीवर असलेली नॉट रिचेबलची टेप नागरिकांना त्रास देणारी ठरत आहे. या प्रकारामुळे नागरिकांची कामे खोळंबत असून त्यांचा त्रास वाढत आहे.
या नगर परिषदमध्ये खा. तडस यांच्या प्रयत्नातून कोट्यवधीची विकास कामे सुरू आहे. यामध्ये साडेतील कोटींचे नाट्यगृह, तीन कोटींचे स्टेडियम, सहा कोटींच्या खर्चातून शॉपींग कॉम्प्लेक्स, बाजार ओट्याचे बांधकाम तसेच आठवडी बाजाराचे सौदर्यीकरण, दोन कोटींच्या खर्चातून नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे सौदर्यीकरण, ३५ कोटींच्या खर्चातून नगर परिषदेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम सुरू आहे. तसेच अंतर्गत रसते, नाल्या व इतर विकासकामे प्रगतीपथावर आहे. ही सर्व कामे न.प. मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत होत आहे. त्यामुळे या सर्व विकासकामांच्या गुणवत्तेचा वाली कोण याबाबत विचारणा होत आहे.
शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणाकरिता यंत्रणा गत एक ते दीड महिन्यापासून धावत आहे; परतु या सर्व घडामोडीत न.प.चा कमांकडरच नामामत्र ठरल्याने ही मोहीम रखडल्यात जमा आहे. अनेक दैनंदिन कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.
मालकी हक्काच्या जागेच्या विवरणासहीत प्रॉपर्टी बाबतच्या अडचणी तसेच महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रासाठभ नागरिकांची फरफट होत आहे. बरेचदा न.प. स्थायी समितीच्या बैठकीला सुद्धा ते गैरहजर राहत आहेत. महत्त्वपूर्ण व आर्थिक बाबीवरील निर्णय उपस्थित सदस्यांवर सोडले जात आहे.
नगर परिषद कार्यालयातील काहींवर कामाचा अतिभार व काहींवर मर्जी ठेवल्या जात असल्याने कर्मचाºयांत प्रत्येक विभागात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने गोंधळाची स्थिती आहे. दिवाबत्तीच्या तक्रारीचे वेळोवेळी निवारण, स्वच्छतेबाबत लोकांच्या अडचणी तसेच उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे. विकास कामांसोबतच दैनंदिन येणाऱ्या अडचणीबाबत येथील नगरसेवकांची हतबलता केविलवाणी ठरली आहे. याकडे खासदारांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
कर्मचाऱ्यांचा थाट ‘आऊट आॅफ कंट्रोल’
मुख्याधिकारी महिन्यातून फक्त दोन ते चार दिवसच ते पालिकेच्या कार्यालयात हजर राहत आहेत. अधिकारी नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचा थाट सध्या आऊट आॅफ कंट्रोल होवू पाहता आहे. खा.रामदास तडस यांची नगर परिषद म्हणून याकडे पाहिले जात आहे. असे असताना येथे असलेली अनागोंदी सर्वांना बुचकळ्यात पाडणारी आहे.