नाफेडने केली १४ हजार ७०० क्विंटल तुरीची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:19 AM2018-03-09T00:19:20+5:302018-03-09T00:19:20+5:30
शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच दर पाडण्याचा प्रकार नित्यनियमाप्रमाणे यंदाही बाजार समित्यांमध्ये घडला.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारात येताच दर पाडण्याचा प्रकार नित्यनियमाप्रमाणे यंदाही बाजार समित्यांमध्ये घडला. यामुळे हमीभावाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी त्यांची तूर नाफेडला देण्याचा निर्णय घेतला. यात आतापर्यंत जिल्ह्यात सुरू असलेल्या ७ खरेदी केंद्रांमधून १४ हजार ७००.६६ क्विंटल तूर खरेदी केली आहे.
तूर खरेदी संदर्भात शासनाने आॅनलाईन पद्धत अस्तित्वात आणल्याने शेतकऱ्यांनी नोंदी करून तूर खरेदीला सहकार्य केले. वर्धा जिल्ह्यात सातही केंद्रांवरून ३ हजार ९५० शेतकऱ्यांकडून नोंदी झाल्या होत्या. त्यापैकी १,२२७ शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली आहे. या तूर खरेदीपोटी त्यांची ८ कोटी १ लाख १८ हजार ५९७ रुपयांचे चुकारे शासनाकडे थकल्याचे सांगण्यात आले आहे.
तूर खरेदी दरम्यान नाफेडच्या केंद्रावर पहिले नमुने घेण्याच्या सूचना केंद्रावरून देण्यात आल्या आहेत. यानुसार शेतकरी पहिले तुरीचे नमुने घेऊन केंद्रावर दाखल होत आहे. येथे शासनाने दिलेल्या निकषानुसार बसत असलेल्या तुरीची खरेदी करण्यात येत असल्याचे जिल्हा मार्केटींग अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले आहे. मध्यंतरी तूर खरेदीनंतर तिची नोंद होण्यास विलंब झाल्याने बºयाच शेतकऱ्यांचे चुकारे अडले होते. आता नाफेडच्या गोदामात तूर पोहोचल्याने शेतकऱ्यांना चुकारे मिळण्यास सुरुवात झाल्याची माहिती मार्केटींग कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या सुविधेकरिता शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
एकाच दिवसात ट्रक खाली होण्याचा नियम
जिल्हास्तरावर तूर खरेदी झाल्यानंतर ती नाफेडच्या मुख्य गोदामात गेल्यानंतर एकाच दिवसात ट्रक खाली होण्याचा नियम आहे. या नियमानुसार काम होणे अपेक्षित असताना तसेच होत नसल्याचे दिसून आले आहे. एक ट्रक खाली होण्याकरिता गोदामात किमान दोन दिवसांचा कालावधी जात असल्याची माहिती आहे.
वर्धेचे गोदाम फुल्ल
कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळत असलेल्या अत्यल्प दरामुळे शेतकरी तूर विक्रीकरिता नाफेडच्या केंद्रावर गर्दी करीत आहेत. यामुळे आवक वाढल्याने खरेदी झालेली तूर जमा करण्याकरिता वर्धेतील गोदाम कमी पडत आहे. बोरगाव (मेघे) व एमआयडीसीतील पणन महासंघाचे गोदाम फुल्ल झाले असून खरेदी झालेले तूर ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.