अंतोरा रेतीघाटात बोट, पोकलँडचा वापर : महसूल प्रशासनाच्या कार्यवाहीकडे अनेकांचे लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : अंतोरा रेतीघाट मधून बोट, पोकलँडचा वापर करून रेतीचा सुमार उपसा होत आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीवरून नायब तहसीलदारांनी गुरुवारी घाटात जाऊन सर्व वाहन जप्त केली. जप्तीच्या कार्यवाहीनंतर दंडात्मक कारवाई झाली नसल्याने जिल्हा प्रशासन या प्रकरणी काय कार्यवाही करते याकडे या भागातील शेतकऱ्यांचे लक्ष आहे. या प्रकरणात कार्यवाही करण्यात हयगय झाल्यास घाट बंद पाडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तालुक्यातील अंतोरा, डांगरपेंढ, शिवरा मधून मोठ्या प्रमाणात रात्रीला बोट लावून रेती उपसा सुरू केला होता. शासन नियमाप्रमाणे बोट व पोकलँड लावता येत नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी तक्रारीत केला आहे. त्या मौजातील शेतकऱ्यांना घाटातूनच ये-जा करावी लागत आहे. मात्र येथून झालेल्या अवास्तव रेती उपस्याने रस्त्याचे खस्ताहाल झाल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. याप्रकरणी शेतकरी नरेंद्र देशमुख, राजेश ठाकरे, सुनील देशमुख, सतीश बोंदरकर, अनिल कोंडेकार, अंकीत मोहोड यांनी वरिष्ठांना तक्रार केली होती. या शेतकऱ्यांची दखल होत गुरुवारी दुपारी नायब तहसीलदार सोनोवने, मंडळ अधिकारी बाळस्कर, पटवारी चव्हाण यांनी रेतीघाटात जाऊन वस्तुस्थिती पाहिली. सर्व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी वोट, पोकलँड जप्त करुन सुपूर्तनाम्यावर रेतीघाट धारकांच्या स्वाधीन केला आहे. याप्रकरणी दोषींवर तात्काळ फौजदारी व दंडात्मक कारवाई करावी अन्यथा रेतीघाट चालू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला नाही. अंतोरा रेतीघाटाचा लिलाव दोन कोटीत झाला असून मनुष्यबळानी रेती उपसा करुन रेती निघत नाही. त्यामुळे मशीनचा वापर करण्याची परवानगी नाकारण्यात आली. याचाच फायदा घेत अनधिकृत पद्धतीने यंत्र लावण्यात आली असून शेतकरी संतापले आहे. यामध्ये अद्याप दंडात्मक कारवाई झाली नाही. पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती तहसीलदार सीमा गजभिये यांनी दिली.
शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून नायब तहसीलदारांनी केला जप्तीनामा
By admin | Published: June 03, 2017 12:30 AM