अवमान टाळा : राष्ट्रध्वज सन्मान अभियान समितीचे साकडे वर्धा : राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसगाड्यांवर अद्यापही फाटलेले राष्ट्र्ध्वज चिकटून आहेत. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचे म्हणत ते काढण्याची मागणी राष्ट्रध्वज सन्मान अभियान समितीने विभागीय नियंत्रकांना एका निवेदनातून केली आहे. महामंडळातील एम.एच. ४० एन. ८२१० क्रमांकाच्या बसवर चारही बाजूने राष्ट्रध्वज चिटकविलेले आहेत; पण त्यातील काही राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत आहेत. ज्या राष्ट्रध्वजासाठी कित्येक शहिदांनी सीमेवर तसेच क्रांतीकारकांनी आपले प्राण दिलेत, तो राष्ट्रध्वज प्राणपणाने जपणे, हे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे. असे असताना राष्ट्रध्वजाचा नकळत होणारा अवमान टाळण्यासाठी त्या बसवरील फाटलेले, धूळ बसलेले राष्ट्रध्वज दोन दिवसांत काढून घ्यावेत. अन्यथा राष्ट्रध्वज सन्मान अभियान समितीचे कार्यकर्ते स्वत: जाऊन ते सन्मानाने काढतील, असा इशारा आज विभागीय नियंत्रक राजीव घाटोळे यांना राष्ट्र्ध्वज सन्मान अभियान समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला. यावर विभागीय नियंत्रक घाटोळे यांनी देखील त्वरित कार्यवाही करीत संबंधित अधिकाऱ्यांना उल्लेखित क्रमांकाची गाडी आगारामध्ये लाऊन राष्ट्रध्वज काढून घ्यावे, अशा सूचना दिल्यात. यावेळी राष्ट्रध्वज सन्मान अभियान समितीचे नीरज बुटे, वैष्णवी डाफ, पलक रोहणकर, शंतनू भोयर, धीरज चव्हाण, दुष्यंत ठाकरे, अमर बेलगे, आशुतोष चेर, कुणाल बहादुरे, कृतिका भोयर, अजिंक्य मकेश्वर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
बसवर फाटलेले राष्ट्रध्वज अद्यापही चिकटलेलेच
By admin | Published: March 01, 2017 1:02 AM