लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आर्वी पोलीस ठाण्यात अवैध गर्भपातप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याची सखोल चौकशी सुरू असताना शनिवारी आर्वी पोलिसांना डॉ. नीरज कदम यांच्या हॉस्पिटलच्या वरील खोलीत वन्यजीवाची कातडी सापडली. त्यानंतर आर्वीचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी आर्वीच्या वनविभागाला माहिती दिली. माहिती मिळताच आर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह अवैध गर्भपाताचा अड्डा असलेले आर्वीचे कदम हॉस्पिटल गाठून ती वन्यजीवाची कातडी ताब्यात घेतली. बारकाईने पाहणी केली असता ही कातडी मादी काळवीटाची असल्याचे पुढे आल्याने डॉ. नीरज कदम यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९ अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आरोपी डॉ. नीरज कदम यांचे बयाण नोंदविणे शिल्लक असतानाच आर्वी पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा ताब्यात घेतलेल्या डॉ. नीरज कदम यांना रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. शिवाय रविवारी न्यायालयात हजर करून त्याची दोन दिवसीय पोलीस कोठडी मिळविली आहे. परंतु, पोलिसांच्या कारवाईमुळे वनविभागाच्या पुढील कार्यवाहीला सध्यातरी काही काळाकरिता ब्रेक लागल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.
सखोल चौकशीअंती होणार कलमवाढ?- काळवीटाची कातडी घरात असतानाही त्याची माहिती दडवून ठेवणाऱ्या डॉ. नीरज कदम यांच्यावर आर्वीच्या वनविभागाने वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९ अन्वये वनगुन्हा दाखल केला आहे. असे असले तरी या प्रकरणाच्या सखोल चौकशीअंती आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या इतर कलमांची वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
शनिवारी काळवीटाची कातडी जप्त करीत डॉ. नीरज कदम यांच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या कलम ९ व ३९ अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. सखोल चौकशीअंती काय वास्तव बाहेर येते त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.- नितीन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, आर्वी.