रात्रीच्या गस्तीचे ‘वाजले की बारा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 05:00 AM2020-09-30T05:00:00+5:302020-09-30T05:00:15+5:30
मात्र, प्रभावी गस्त नसल्याने रहदारीच्या रस्त्यावरील दुकानेही फोडल्या जात असल्याचे चित्र आहे. गस्त घालणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याने गस्तीवरील कर्मचारी मध्यरात्रीनंतर गस्तीला दांडी मारतात. शहरातील अनेक भागात कधीच गस्त घातली जात नसल्याचे दिसून येते. बऱ्याचवेळेस पोलिसांची वाहने फक्त मुख्य रस्त्याने फिरतात. छोटे रस्ते, अरुंद रस्त्यांवर कधीच पोलिसांचे वाहन जात नाहीत. त्यामुळे साहजिकच चोरट्यांना आयते रान होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातसह जिल्ह्यात विविध ठिकाणी रात्रीच्यावेळी होणाऱ्या चोºया, घरफोड्या पोलिसांच्या डोकेदुखी ठरल्या आहेत. तपासाच्या नावाने जशी बोंब आहे, तशाच पद्धतीने पोलिसांच्या गस्तीचेही ‘तीनतेरा’ वाजले आहेत. त्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत चालले आहे.
शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बीट मार्शल, मोबाईल पेट्रोलिंगसह ब्रेकर एबल अशा वाहनांतून गस्त घातली जाते. मात्र, प्रभावी गस्त नसल्याने रहदारीच्या रस्त्यावरील दुकानेही फोडल्या जात असल्याचे चित्र आहे. गस्त घालणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याने गस्तीवरील कर्मचारी मध्यरात्रीनंतर गस्तीला दांडी मारतात. शहरातील अनेक भागात कधीच गस्त घातली जात नसल्याचे दिसून येते. बऱ्याचवेळेस पोलिसांची वाहने फक्त मुख्य रस्त्याने फिरतात. छोटे रस्ते, अरुंद रस्त्यांवर कधीच पोलिसांचे वाहन जात नाहीत. त्यामुळे साहजिकच चोरट्यांना आयते रान होते. शहरातील या परिस्थितीमुळे चोºया, घरफोड्यांचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही.
रात्रीच्यावेळी गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांवर बॅटऱ्याही नसतात रात्रीच्या बॅटऱ्याच नसतील तर आडोशाला लपलेले चोरटे पोलिसांना कसे दिसणार, बिना बॅटरी गस्त घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पळून चाललेले चोरटे कसे समजणार, असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात.
तसेच अनेक पोलिसांकडे शिट्ट्याही नाहीत. वाहनाचा सायरन असेल, पोलीस शिट्ट्या वाजवू लागले तर पोलीस रस्त्याने फिरत आहेत, याची जाणीव होते. त्यामुळे चोऱ्यांना काही प्रमाणात प्रतिबंध बसायला मदत होईल. तसेच गस्तीवरील किती कर्मचारी सोबत काठी ठेवतात. हाही संशोधनाचा विषय आहे.
गस्तीवरील काही वाहनेही खराब झालेली आहे. त्यामुळे संशयीत वाहनांचा पाठलाग कसा करायचा. असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मार्शल, चार्ली पथके गुंडाळली
शहरातील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयांतर्गत मार्शल पथक आणि चार्ली पथक स्थापन करण्यात आले होते. कुठेही घटना किंवा गुन्हा घडल्यास या पथकातील कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहचून त्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालय तसेच संबंधित पोलीस ठाण्याला देत होते. मात्र, मागील काही वर्षांपासून मार्शल आणि चार्ली पथके बंद करण्यात आल्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी आणि चोरट्यांनी डोकेवर काढल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधीक्षक होळकर यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
आर्वीत एकाच रात्री चार घरफोड्या
शहरातील शिवाजी चौकातील मोबाईल शॉपी फोडण्याच्या दुसऱ्याच दिवशी चोरट्यांनी शहरात पुन्हा हैदोस घालून चार ठिकाणी घरफोड्या केल्या. प्रशांत कराळे रा. संभाजीनगर यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून पाकीटात ठेवलेले एक हजार रुपये, दागिने काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना जाग आल्याने त्यांनी पळ काढला. प्रा. हेमराज चौधरी यांच्या घरी चोरी तरीत पॅन्टातील खिशातून व कपाटातील पर्समधून दोन हजार रुपये, एक हजाराचे बेनटेक्सचे दागिने असा सहा हजारांचा माल चोरुन नेला. एलआयजी कॉलनी परिसरातील मोहन मैदानकर यांच्या घरात प्रवेश करीत सात हजार रुपयांची रोख लंपास केली. तर सुरेश उईके यांच्या घरातील दाराचे कुलूप तोडून प्रवेश केला पण, त्यांचा चोरीचा प्रयत्न फसला.
दुचाकी चोरीच्या घटनांना आवर घाला
शहरासह जिल्ह्यात दररोज दुचाकी चोरींच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दुचाकी चोरी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे. यावर आवर कोण घालणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
अचानक नाकाबंदी करण्याची आवश्यकता
रात्रीच्यावेळी कोणत्याही रस्त्यावर अचानकपणे नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी सुरु केल्यास चोऱ्यांना आळा बसू शकतो. मात्र, शहरात तसा उपक्रम राबविल्याचे जाणवतही नाही. बऱ्याचवेळी गस्तीवरील मोठ्या वाहनांतही एक-दोन कर्मचारी नियुक्त असतात. अपुरे पोलीस मनुष्यबळही अडसर ठरत आहे.