राज्यातील ७५ नव्हे ११७ नद्या होतेय 'अमृतवाहिन्या'
By महेश सायखेडे | Published: March 19, 2023 06:25 PM2023-03-19T18:25:46+5:302023-03-19T18:25:53+5:30
सोलापूरच्या 'कासाळ गंगा'चा अहवाल शासनाला सादर
वर्धा: ‘चला जाणूया नदीला’ हे घोषवाक्य केंद्रस्थानी ठेवून राज्यातील ७५ नद्यांना अमृतवाहिन्या बनविण्याचा मानस उराशी बाळगून नद्यांच्या परिक्रमेचा उपक्रम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून वर्धा येथे श्रीगणेशा करीत हाती घेण्यात आला आहे. सेवाग्राम येथे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर आपआपल्या कार्यक्षेत्राच्या दिशेने स्वयंसेवक रवाना झाल्यावर प्रत्यक्ष कृती करतेवेळी उपक्रमात सहभागी नद्यांची संख्या वाढविण्यात आली आहे.
सद्य:स्थितीत राज्यातील गोदावरी, तापी, नर्मदा, कृष्णा व पश्चिम वाहिन्यांच्या खोऱ्यातील एकूण ११७ नद्या अमृतवाहिन्या करण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहेत. संबंधित नद्यांची सद्य:स्थितीची माहिती गोळा करून या नद्या निर्मल कशा होईल या दृष्टीने सूक्ष्म आराखडा तयार करून तो प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला सादर करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील महूद तालुका सांगोला येथील कासाळ गंगा नदीचा प्रस्ताव ग्रामस्थांच्या माध्यमातून ३ मार्चला शासनाला सादर करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कासाळ गंगा नदीचा लोक अभ्यास व कृती अहवालात सोलापूर जिल्ह्यातील ७१ पाझर तलाव पुनर्जीवन करणे यासह विविध मुद्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. पाझर तलावांचे पुनर्जीवन झाल्यास सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढच होणार आहे.
७० टक्के नद्यांचा संवाद पूर्ण
चला जाणूया नदीला या उपक्रमांतर्गत ११७ नद्या अमृतवाहिन्या करण्यासाठी विशेष प्रयत्न होत आहे. ११७ पैकी ७० टक्के नद्यांची संवाद यात्रा आतापर्यंत पूर्ण झाली आहे, तर उर्वरित नद्यांची संवाद यात्रा झटपट पूर्ण करून लोक अभ्यास व कृती अहवाल एप्रिल अखेरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला सादर होणार असल्याचे सांगण्यात आले.
'धाम'च्या संवाद यात्रेचा सोमवारी श्रीगणेशा
चला जाणूया नदीला अभियानांतर्गत वर्धा जिल्ह्यातील धाम, वणा व यशोदा या तीन नदींचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी धाम नदीची संवाद यात्रा सोमवार २० मार्चपासून धाम नदीचे उगमस्थळ असलेल्या कारंजा तालुक्यातील धामकुंड येथून सुरू होणार आहे. नदी काठावरील ४५ गावांची परिक्रमा करीत लोक अभ्यास पूर्ण करीत कृती अहवाल तयार केला जाणार आहे. यात्रेच्या शुभारंभाप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे, अभियानाच्या नोडल अधिकारी सुप्रिया डांगे, मंगेश वरकड, भरत महोदय, सुनील रहाणे, मुरलीधर बेलखोडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.
चला जाणूया नदीचा या उपक्रमांतर्गत वर्धा जिल्ह्यातील तीन नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. सोमवारपासून धाम नदीच्या संवाद यात्रेचा शुभारंभ होत आहे. वर्धा जिल्ह्यातील तिन्ही नद्यांचा लोक अभ्यास व कृती अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात शासनाला सादर करण्याचा मानस आमचा आहे.
- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा.