आता ‘क्रॉसचेक-डबलचेक’ मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 09:56 PM2018-12-13T21:56:37+5:302018-12-13T21:58:01+5:30
निवडणुकींच्या काळात इव्हीएम मशीनबाबत अनेक वावड्या उठतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये असलेले गैरसमज दूर करुन मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट जोडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : निवडणुकींच्या काळात इव्हीएम मशीनबाबत अनेक वावड्या उठतात. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये असलेले गैरसमज दूर करुन मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इव्हीएम सोबत व्हीव्हीपॅट जोडले आहे. त्यामुळे आता मतदाराला आपले मत कुणाला गेले याबाबत ‘क्रॉसचेक व डबलचेक’ करता येणार आहे. यासाठी जिल्हाभरात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी इव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रशिक्षण, प्रसार व जनजागृतीबद्दल माहिती देऊन मशीनचे प्रात्यक्षिक ही यावेळी अधिकाºयांनी करुन दाखविले. आगामी निवडणुकींमध्ये प्रथमच इव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार असल्याने जनतेमध्ये विश्वासर्हता निर्माण व्हावी म्हणून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. प्रशासनाच्यावतीने मागील तीन महिन्यांपासून मतदार यादीचे सुसुत्रीकरण करण्यात आले. यामध्ये नवीन मतदारांच्या नावाचा समावेश करण्यासोबतच मृतकांचे नाव वगळणे तसेच गाव सोडून गेलेल्यांची नावे गाळणे हे सर्व कामे करण्यात आली आहे. आता प्रत्येक गावांमध्ये अंतीम मतदार यांदी पाठविली जाणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधींनी आपले बुथ लेवलवर प्रतिनिधी नियुक्त करुन मतदार यादींची तपासणी करावी, तसेच नागरिकांनीही याची तपासणी करुन काही आक्षेप असल्यास तात्काळ कळवावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले.
यावेळी सामान्य व निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रवीण महिरे, जिल्हा माहिती अधिकारी मनिषा साळवे यांच्यासह विभागीतील कर्मचारी उपस्थित होते.
१६ पथक राबविणार जनजागृती मोहीम
जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील महत्वांच्या गावामध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता १६ पथक तयार करण्यात आले असून त्यामध्ये एकूण ८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील १ हजार ठिकाणी या मतदान पद्धतीचे प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येणार आहे. यामध्ये रेल्वे स्थानक , बस स्थानक, सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र, शाळा-महाविद्याल यांचा समावेश असणार आहे. प्रात्यक्षिक करतांना मतदारांना काही शंका असल्यास त्याचे निकाकरण करण्यात येईल. त्यांनी जितके प्रश्न उपस्थित केले तितक्याच सुधारणा करण्यासही सोयीस्कर होईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
३५ हजार नवीन मतदार नोंदणी
जिल्ह्यात मतदान नोंदणी अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. यामध्ये जवळपास ३५ हजार नव मतदारांनी नोंदणी केल्याची माहिती देण्यात आली. तसेच आतापर्यंत १० लाख मतदारांची यादी तयार करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. यावर्षी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट व्दारे होणारे हे मतदान अनेकांसाठी नवीनच राहणार असल्याने अनेकांना उत्सुकताही वाढणार आहे.
काय आहेत व्हीव्हीपॅट
आतापर्यंत इव्हीएम मशीनव्दारे मतदार केले जायचे. त्यामध्ये कंट्रोल युनिट व बॅलेट युनिट असायचे. बॅलेटपेपरवर असलेल्या चिन्हापुढील बटन दाबली की बीप आवाज करुन मतदान झाल्याची नोंद व्हायची.परंतु आपण कुणाला मतदान केले याची श्वास्वती होत नसल्याने अनेकांनी या इव्हीएमवर आक्षेप नोंदविले आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाने इव्हीएम मशीनसोबतच व्हीव्हीपॅड जोडले आहे. त्यामुळे मतदाराने कुणाला मतदान केले हे त्याला सात सेकंदापर्यंत बघता येणार आहे. त्यानंतर तो बॅलेटपेपर त्या पेटीत पडणार आहे. आक्षेप आल्यास परवानगी घेऊन शहानिशाही करता येणार आहे.