आता पवनार व वरूडचा नूर पालटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:58 PM2018-10-12T23:58:47+5:302018-10-13T00:00:10+5:30
सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वर्धा शहरालगतच्या पवनार व वरुड या गावातही पायाभूत सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. डॉ. पंकज भोयर यांनी वित्त तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत वर्धा शहरालगतच्या पवनार व वरुड या गावातही पायाभूत सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी आ. डॉ. पंकज भोयर यांनी वित्त तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. सोबतच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करुन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या शिखर समितीने पवनार व वरुड या गावांचा सेवाग्राम विकास आराखड्यात समावेश करुन सदर गावांच्या पायाभूत सुविधांसाठी १७.५१ कोटींच्या विकास कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे आता सेवाग्रामसोबतच या दोन्ही गावांचाही कायापालट होणार आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंतीला २ आॅक्टोबर २०१९ ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याने १ आॅक्टोबर २०१६ अन्वये १४४ कोटी ९९ लाख ७५ हजार रुपये किंमतीच्या विकास आरखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. विशेषत: वर्ध्यात महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचे वास्तव्य राहिल्याने या शहराला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सेवाग्राम येथून बापूंनी स्वातंत्र्याची तर पवनार येथून विनोबांनी भूदानाची चळवळ सुरु केल्याने या दोन्ही गावांना ऐतिहासिक महत्व आहे. तसेच या मार्गावरील वरुड हे गावही विकासापासून कोसो दूर राहिल्याने सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत पवनार व वरुड या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता १७ कोटी ५१ लाख ५२ हजार रुपयाच्या निधीची मागणी करण्यात आली होती. ही मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली २४ आॅगस्ट रोजी झालेल्या शिखर बैठकीत पवनार व वरुड या गावांचा समावेश करुन निधीला मंजूरी देण्यात आली. त्यामुळे सुरुवातीचा १४४ कोटी ९९ लाख ७५ हजार रुपयाचा सेवाग्राम विकास आराखडा आता १६२ कोटी ५१ लाख २७ हजार रुपयांवर पोहचला असून या सुधारित सेवाग्राम विकास आराखड्याला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच या आरखड्याच्या अंमलबजावणी नियोजन विभागाकडे सोपविण्यात आल्याने नियोजन विभागाने या संदर्भात १० आॅक्टोबरला आदेश काढला आहे. पवनार आणि वरुड या गावातील नागरिकांच्या मागणीनुसार आ. डॉ. पंकज भोयर यांनी सतत पाठपुरवा केला होता. अखेर या पाठपुराव्याला यश मिळाले असून या गावांचा सदर निर्णयामुळे कायापालट होणार असल्याने तेथील रहिवाशांनाही दिलासा मिळाला आहे.
साडे सतरा कोटींच्या निधीमधून होणारी कामे
शासनाच्या आदेशानुसार पवनार या गावातील पायाभूत सुविधांकरिता ६ कोटी ९ लाख ९७ हजार रुपयाच्या कामांना मंजूरी मिळाली असून यातून सिमेंट रस्ता बांधकाम, रस्त्याच्या बाजुने पक्क्या नालीचे बांधकाम, सार्वजनिक ठिकाणी एलईडी पथदिवे बसविणे, सध्याच्या सचिवालयाच्या इमारतीतील वाचनालाची दर्जोन्नती करणे, वॉर्ड नं.२ मधील बगीच्याचा विकास, धाम नदीच्या काठावर स्मशानभूमीजवळ घाट बांधकाम, सार्वजनिक ठिकाणी हायमास्ट लावणे, ४० कि.वॅ. क्षमतेचे सौर उर्जा संच बसविणे व ग्रामपंचायत भवनाचे बांधकाम आदी कामे करण्यात येणार आहे. तर वरुड या गावाकरिता ९ कोटी ९१ लाख ४८ हजार रुपयाच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. यातून सिमेंट रस्ता बांधकाम, विटाच्या नालीचे बांधकाम,नविन नाला बांधकाम, वॉर्ड नं. १ ते ५ मध्ये अतिरिक्त विद्यूत पोलसह पथदिवे बसविणे, याच परिसरातील खुल्या जागेचे सौदर्यीकरण करणे, धन्वंतरीनगर चौकात हायमास्ट लाईट लावणे व ४० के.व्ही. क्षमतेचे सौरउर्जा संच बसविण्यात येणार आहे.
वर्षभरात पूर्ण करावी लागणार कामे
सेवाग्राम विकास आराखड्यात समाविष्ट असलेली सर्व कामे २ आक्टोबर २०१९ पूर्वी पूर्ण करण्याचे आदेशात नमूद केले असून या कामांशी संबंधित सर्व विभागांचे समन्वय करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त,नागपूर व जिल्हाधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या कामाचा मासिक आढावा घेणे, कामानिमित्त जिल्हास्तरावरील कोणत्याही अधिकाºयास बोलाविण्याचे व त्यांना योग्य सूचना करण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना दिले आहे. तसेच या विकासकामांच्या प्रगतीबाबत विभागीय आयुक्त नागपूर यांनली त्रैमासिक आढावा घेऊन त्याचा अहवाल शासनास सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
पवनार व वरुड या गावातील नागरिकांच्या मागणीनुसार या गावांचा सेवाग्राम विकास आराखड्यात समावेश करण्याची मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. या दोन्ही गावाचा समावेश करण्यामागची कारणमिमांसाही स्पष्ट करुन प्रस्ताव सादर केला होता.अखेर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या शिखर समितीने या गावांचा समावेश करण्यात आला. त्यासाठी वेगळा निधीही उपलब्ध करुन दिला.त्याबद्दल मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचे आभार मानतो. आता पवनार येथील पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, हाच प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. पंकज भोयर, आमदार.
सेवाग्राम विकास आरखड्यातून नदी पात्र आणि आश्रम परिसराचा विकास होणार होता. या पर्यटनस्थळामुळे दरवर्षी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने त्यांनी जर गावाचा फेरफटका मारला तर गावाचा अंतर्गत विकास होणेही अपेक्षीत होते. म्हणून सरपंच या नात्याने आमदार डॉ.पंकज भोयर यांच्याक डे तशी मागणी करण्यात आली. त्यांनी लगेच या मागणीबाबत पाठपुरावा सुरु केल्याने यशही मिळाले. गावाच्या विकासासाठी ९ कोटी ९१ लाख ४८ हजार रुपयाच्या निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे सरपंच या नात्याने डॉ.पंकज भोयर यांचे आभार व्यक्त करतो.
- अजय गांडोळे, सरपंच, पवनार.