रोटरी उत्सवास मैदान मिळण्यासाठी न.प.वर दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 12:32 AM2018-11-17T00:32:56+5:302018-11-17T00:34:26+5:30
जानेवारी महिन्यात वर्धा येथे रोटरी फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. या फेस्टीव्हलसाठी जुन्या आरटीओ आॅफीस जवळील लोक महाविद्यालयाचे मैदान उपलब्ध करून द्यावे यासाठी स्थानिक नगर पालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव आणण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जानेवारी महिन्यात वर्धा येथे रोटरी फेस्टीव्हलचे आयोजन करण्यात येत आहे. या फेस्टीव्हलसाठी जुन्या आरटीओ आॅफीस जवळील लोक महाविद्यालयाचे मैदान उपलब्ध करून द्यावे यासाठी स्थानिक नगर पालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव आणण्यात येत असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र, नगर पालिकेने चार महिन्यांपूर्वी मैदान उत्सव, महोत्सव तसेच फेस्टीव्हल कार्यक्रमासाठी देण्यात येऊ नये असा ठराव पारित केला आहे. त्यामुळे रोटरी फेस्टीव्हलचे आयोजन यंदा अडचणीत येण्याची चिन्हे आहेत.
जुने आरटीओ कार्यालय जवळील हे मैदान लोक महाविद्यालयाच्या मालकीचे आहे. मात्र, येथे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी नगर पालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. या मैदानाच्या परिसरात पाच ते सात हजार लोकांचे वास्तव्य आहेत. येथे आयोजित होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे तसेच वाहनांच्या आवागमनामुळे निर्माण होणाºया धुळीचा त्रास नागरिकांना होतो. तसेच हे उत्सव आठ ते दहा दिवस चालतात. या काळात ध्वनीप्रदुषणही होते. त्याचाही त्रास नागरिकांना होतो.
रोटरी फेस्टीव्हलच्या आयोजनात बाहेर गावांवरून आणि परप्रांतातून झुले व व्यावसायिक येतात. त्यांचे तीनशे ते चारशे कामगार या मैदानाच्या सभोवताल उघड्यावर शौचास जातात. तसेच उघड्यावरच परिसरातील बोरवेलवर महिला व पुरूष कामगार आंघोळ करतात. या परिसरात अन्न पदार्थ विक्रीचेही दुकान लागतात. त्यांचे अन्न वापरलेल्या पत्रावळी तशाच पडून राहतात. स्वच्छतेकडे कुणीही लक्ष देत नाही. रोटरीचे आयोजन केवळ व्यावसायिक दृष्टीकोनातून केले जाते. मुठभर लोकांना व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी पाच ते सात हजार लोकांना वेठीस धरण्याचे काम करण्यात येते.
मागील पाच वर्षांपासून या भागातील नागरिक याबाबत सातत्याने पालिका प्रशासनाकडे तक्रारी करीत होते. मात्र, पालिका प्रशासनाने आजवर काहीही कार्यवाही केली नाही. अलीकडेच चार महिन्यांपूर्वी सदर मैदान अशा कार्यक्रमांना देऊ नये असा ठराव पारित करण्यात आला आहे. त्यामुळे आता रोटरी फेस्टीव्हलला मैदान मिळणे कठीण झाल्याने शहरातील भाजपचे पदाधिकारी व मोठे कार्यक्रम पालिका प्रशासनावर हा ठराव मागे घेण्यासाठी दबाव आणत आहे.
नागरिकांना वेठीस धरून मुठभर व्यावसायिकांच्या पाठीशी उभ्या राहणाºया भाजपाच्या पदाधिकाºयांना जनतेशी काहीही देणं-घेणं नसल्याचे यावरून दिसून येत आहे. गतवर्षी रोटरी फेस्टीव्हलमधून अपंग व्यक्तीचे स्टॉल फेकुन देण्यात आले होते. हे विशेष. त्यामुळे अशा आयोजनाला नगर पालिका प्रशासन व वर्ध्याचे नगराध्यक्ष अतुल तराळे परवानगी देतात काय? याकडे या परिसरातील लोकांचे लक्ष लागत आहे. या भागात शाळा, खासगी दवाखाने आहेत. आवाजाचा या भागातील नागरिक, रुग्ण, विद्यार्थी यांनाही त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन या कार्यक्रमाच्या आयोजनाला परवानगी देऊ नय,े अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पालिकेने ठराव मागे घेऊन परवानगी दिल्यास नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
ग्रामपंचायतीच्या हद्दीत आयोजन करा
जुन्या आरटीओ कार्यालय जवळील मैदान रोटरी उत्सवसह कोणत्याही महोत्सवाला देण्यात येऊ नये. नगर पालिका प्रशासनाने याबाबत परवानगी नाकारावी. अशा महोत्सवाचे आयोजन वर्धा शहराच्या बाहेर मैदानांवर करावे अशी मागणी या मैदान परिसरातील नागरिकांनी लेखी स्वरूपात केली आहे. याबाबत नागरिक लवकरच जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांची भेट घेवून त्यांनाही निवेदन देणार आहेत.
या संदर्भात नगर पालिकेची भूमिका जाणून घेण्यासाठी नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्याशी संपर्क केला; पण त्यांचा भ्रमणध्वनी प्रतिसाद देत नव्हता.
तीन विद्यार्थी बचावले
गतवर्षी येथे कृषी विभागाच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मंडप टाकण्यासाठी वीस फुट उंचीची शिडी लावण्यात आली. येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयाचे विद्यार्थी क्रिकेट खेळत होते. यातील तीन विद्यार्थ्यांच्या अंगावर शिडी कोसळता कोसळता वाचली. त्यावेळी मोठी दुर्घटना टळली.
या भागातील नागरिकांचा उत्सवासाठी मैदान देण्यास साफ विरोध आहे. स्वत: आपण ४०० नागरिकांचे निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद वर्धा यांना दिले आहे. हे मैदान सार्वजनिक उत्सवांसाठी देण्यात येऊ नये याबाबतचा ठराव आपणच मांडला होता. शिवाय सर्वांनुमते पारित झाला. अखेर लोकांच्या भावनाचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्यात फेरबदल होणार नाही.
- श्रेया देशमुख, नगरसेवक, वर्धा.