कंत्राटदाराची बनवाबनवी माजी नगराध्यक्षाने केली उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:01 PM2018-12-13T22:01:38+5:302018-12-13T22:02:43+5:30
शहरातील घरोघरी जावून कचरा उचलण्याचा कंत्राट प्रती टनच्या भावाने नागपुरच्या कंत्राटदाराला दिला आहे. त्या कंत्राटदाराने मजुरांकरवी कचरा उचलणाऱ्या वाहनात दगड लवपवून वजन वाढविण्याचा प्रकार चालविला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू : शहरातील घरोघरी जावून कचरा उचलण्याचा कंत्राट प्रती टनच्या भावाने नागपुरच्या कंत्राटदाराला दिला आहे. त्या कंत्राटदाराने मजुरांकरवी कचरा उचलणाऱ्या वाहनात दगड लवपवून वजन वाढविण्याचा प्रकार चालविला होता. हा प्रकार माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक डॉ. राजेश जयस्वाल यांनी उघडकीस आणल्याने नगरपंचायतीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
मागील पंधरा दिवसापूर्वी स्वच्छतेच्यादृष्टीने घरोघरी जावून ओला व सुका कचरा तसेच प्लास्टीक उचलून ते निर्धारीत ठिकाणी नेवून टाकण्यात येत आहे. याचा कंत्राट नागपुरातील साजन पारस्कर यांच्या व्ही.आर.ए.एंटरप्रायजेसला एक हजार रुपये प्रतीटन प्रमाणे दिला. त्यानुसार कचºयाची वाहतूक सुरु असताना वाहनाच्या वजनाबाबत नगरसेवक डॉ.राजेश जयस्वाल यांना शंका आल्याने त्यांनी नगरपंचायतीच्या संबधित महिला अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. पण, त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केल्याने जयस्वाल यांनी वाहनांवर पाळत ठेऊन वजन करण्यासाठी ती वाहने बाजार समितीच्या काट्यावर पोहचताच डॉ.जयस्वाल हे उपाध्यक्ष अनिल काटोले, नगरसेवक मंगेश वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप भजभुजे यांना सोबत घेऊन तेथे आले.
वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनात कचऱ्याखाली ९० किलो वजनाचे ४ मोठे दगड आढळून आले. याबाबत नगरसवेक जयस्वाल यांनी नगरपंचायतीला कळविल्यानंतर कर निरिक्षक दिनेश दुधे, प्रशांत रहांगडाले यांनी येवून पंचनामा करीत दगड ताब्यात घेतले. लगेच माजी नगराध्यक्ष चुडामन हांडे, गटनेते शैलेंद्र दप्तरी व नगराध्यक्ष शारदा माहुरे यांनी घटनास्थळ गाठले. आता नगरपंचायत या कंत्राटदारावर काय कारवाई करणार, याकडे सर्व सेलू वासीयांचे लक्ष लागले आहे.
कंत्राटदाराने कचऱ्याचे वजन वाढविण्यासाठी आपल्या कामावरील मजुरांना दगडाचा वापर करायला लावला. वाहनाच्या वजनाबाबत शंका होती. त्यामुळे पाळत ठेऊन कंत्राटदाराचा भ्रष्ट कारभार पकडला.त्या कंत्राटदाराचा कचरा उचलण्याचा परवाना रद्द करण्याची मागणी मी लावून धरणार आहे.
- डॉ.राजेश जयस्वाल, नगरसेवक नगरपंचायत सेलू.
मला हा प्रकार कळल्यावर मी घटनास्थळी पोहचली. कंत्राटदाराला बोलावून मुख्याधिकाºयासमक्ष चर्चा करुन यातील दोषीवर नक्कीच कारवाई केल्या जाईल.
- शारदा माहुरे, नगराध्यक्ष नगरपंचायत सेलू.