लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: देशभक्त, वेदशास्त्रसंपन्न,लेखक आणि महात्मा गांधीजींचा शिपाई अशी खरी ओळख असणारे म्हणजे पं. दत्तात्रेय वासुदेव परचुरे. पण त्यांची ओळख मात्र कुष्ठरोगी परचुरे शास्त्री अशीच समाजात निर्माण झाली. स्वदेशी चळवळ आणि देशभक्ती ओतपोत भरलेल्या शास्त्रीजींचे जीवन सदैव उपेक्षित असेच राहिले असले तरी गांधीजींच्या सेवेमुळे ते सदैव लोकांच्या स्मरणात राहिले. अशा महान वेदशास्त्रीचा ५ सप्टेंबर हा स्मृृतीदिन. त्यांचे स्मरण युवकांना होणे आवश्यक आहे.प्रत्येक व्यक्तीला चरित्र व चारित्र्य असते तसेच पं.परचुरे शास्त्री यांनाही होते. ते वेदाचे व संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. पण ते पुराणात अडकले नाहीत. बुरसटलेल्या विचारांना थारा न देता स्वातंत्र चळवळ, सत्याग्रह आणि रचनात्मक कार्याला प्राधान्याने महत्त्व देऊन कार्य केले. यासाठी त्यांनी वैयक्तिक सुखाचा त्यागही केला. गांधीजींच्या कामाला स्वत:ला वाहून घेतले ते अखेरपर्यंत. यात त्यांच्या पत्नीने त्यांना उत्तम साथ दिली. ज्ञानी व्यक्ती अन्यायाचा विरोध करतो. विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी वाई येथील प्राज्ञ शाळेच्या माध्यमातून विद्यादानाचे कार्य सुरू केले. घर खर्चासाठी ते मानधन घेत असत. आपल्या पत्नीसह मुळशी आणि कोयना धरणाच्या विरोधी सत्याग्रहात त्यांची महत्वाची भूमिका होती. त्यांचा विवेकशून्य विकासाला विरोध होता. खेड्यातील लोकांच्या उत्थानासाठी त्यांनी रचनात्मक कार्याचा विचार पोचविण्याचे कार्य केले. यामुळे त्यांना ग्रामसेवक परचुरे शास्त्री या नावाची नवीन ओळख निर्माण झाली. देशातील शेतकरी निर्भय आणि निर्व्यसनी बनणार नाही तोपर्यंत त्यांचा विकास होणार नाही असे त्यांचे मत होते.कुष्ठरोग होण्याच्या पूर्वी त्यांनी तुरूंगवास ही भोगला होता. कुष्ठरोग झाल्यावर ते मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले होते. तुरूंगवासात ते महारोगी वार्डात राहिले. सूतकताई हा त्यांच्या जीवनातील दैनिक भाग झाला होता. ग्रामोद्योग व स्वालंबन यावर त्यांची नितांत श्रद्धा होती. गांधीजींचे कार्यच देशाला मारणारे आहे यावर विश्र्वास होता. यामुळेच कुषठरोग होऊनही ते थकले वा उन्मळून पडले नाही. तुरूंगात रविंद्रनाथ टागोर यांच्याशी भेट झाली. कुटुंबांनी त्यांना अव्हेरले पण मित्र आणि गांधीजींचा सहयोग व प्रेम कायम मिळत राहिले. समाजातील सर्वच लोकं वाईट नसतात हे अनेक उदाहरणाने दिसून आले.गांधीजींना आश्रमच्या बाहेर जाणे आवश्यक असल्याने त्यांची व्यवस्था दत्तपूर येथे मनोहर दिवान यांच्यावर सोपवली. येथेच त्यांची ५ सप्टेंबर १९४५ रोजी वयाच्या ५७ व्या वर्षी प्राणज्योत मावळली. मनोहर दिवानी यांनी अग्नी दिला. कुटुंबातील कुणीच उपस्थित नव्हते. होते फक्त आचार्य विनोबा भावे आणि सहकारी. महारोगाने ते पिडीत नसते तर या महाराष्ट्रात त्यांची एक वेगळी ओळख नक्कीच असते. अशा अनामिक व उपेक्षित समाजाच्या बळी ठरलेल्या पं.परचुरे शास्त्रीजींचे स्मरण करून श्रद्धांजली वाहणे आपले कर्तव्य आहे.
देशभक्त, संपूर्ण स्वदेशी जीवन व कार्याचा अनोखा संगम असलेले पं.परचुरे शास्त्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 4:12 PM