भांबावलेल्या अवस्थेत परप्रांतीय युवक आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:04 AM2018-10-13T00:04:27+5:302018-10-13T00:05:10+5:30
येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करीत असलेल्या एका युवकाला ताब्यात घेवून विचारपूस करण्यात आली. सुमारे १८ वर्षीय युवकाला मराठी भाषा बोलताही येत नव्हती.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील रेल्वे स्थानकावर संशयास्पद हालचाली करीत असलेल्या एका युवकाला ताब्यात घेवून विचारपूस करण्यात आली. सुमारे १८ वर्षीय युवकाला मराठी भाषा बोलताही येत नव्हती. या युवकाशी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विक्की वाघमारे, रोहित आस्कर, यांनी दुभाषिकांचे माध्यमातून विचारपूस करून त्याला त्याच्या पालकाच्या स्वाधीन केले.
ओडिशा (भुवनेश्वर) येथील श्रीनाथ केलास मलीक हा गुजरात येथे काम करीत होता. परंतु, तेथे काम मिळत नाही म्हणून तो हैदराबादला जात असताना हिंगणघाटच्या रेल्वे स्थानकावर उतरला. तो भांबावलेल्या अवस्थेत या दोन युवकांना आढळुन आला. त्यांनी त्याची विचारपूस केली असता भाषेचा प्रश्न निर्माण झाला. मात्र, त्याच्या आधारकार्ड वरून तो भुवनेश्वरचा असल्याचे पुढे आले. त्यामुळे या युवकांने आपल्या ओळखीचे ओरिसी मित्राला घटना समजावून त्याच्या माध्यमातून या मुलाकडुन त्याचे वडिलांचा मोबाईल नंबर मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. पुन्हा भाषेचा प्रश्न निर्माण झाला. त्याच्या पालकाने हिन्दी समजणाऱ्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. त्यानंतर श्रीनाथच्या वडिलांनी झटपट हिंगणघाट गाठले. त्यानंतर श्रीनाथला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
जोपासली सामाजिक बांधिलकी
श्रीनाथकडे असलेल्या मोबाईलची बॅटरी संपल्याने त्याचा भ्रमणध्वनी बंद झाला होता. भांबावलेल्या अवस्थेत आढळलेल्या श्रीनाथला सदर तरुणांनी सामाजिक बांधिली जोपातस धीर देत त्याच्याकरिता जेवनाची व्यवस्था केली. शिवाय हिंगणघाट पोलिसांनाही माहिती देऊन ठाणेदारांच्या स्वाधीन केले. श्रीनाथच्या घर वापसीसाठी विक्की वाघमारे, रोहित आस्कर, सोनु जाधव, शुभम माळवे, आंदीत्य शिंदे, लखन नागापुरे, अभय दांरोड़े, सुरज गांवडे, अमरदीप बन्सोड आदींनी सहकार्य केले.