शहरात वाहनतळाची वानवा
By Admin | Published: March 1, 2017 12:58 AM2017-03-01T00:58:28+5:302017-03-01T00:58:28+5:30
शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; पण सध्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने
वाहतुकीचा बट्ट्याबोळ : बजाज चौकातही ‘ट्रीपल सीट’चा प्रवास
वर्धा : शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे; पण सध्या वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने महत्त्वाच्या बजाज चौकातूनही दुचाकींवर ‘ट्रीपल सिट’चा प्रवास होताना दिसतो. शिवाय शहरात वाहनतळाची वानवा असल्याने रस्त्यावरच वाहने ‘पार्क’ केली जात असल्याचे चित्र आहे. नगर पालिका व वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देत उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांकडे असते. शिवाय शहरात वाहनांसाठी पार्किंग झोन निर्माण करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाला पार पाडावी लागते; पण दोन्ही यंत्रणांना जबाबदारीचा विसर पडल्याचेच सध्या दिसून येत आहे. बजाज चौकात ‘पे अॅण्ड पार्क’ची व्यवस्था करण्यात आली आहे; पण ती अत्यंत तोकडी आहे. शिवाय ही व्यवस्था केवळ भाजी बाजार वा बस स्थानकावर जाणाऱ्या वाहनधारकांच्या उपयोगाची आहे. बाजार परिसरात कुठेही पार्किंगची व्यवस्था नाही. मुख्य मार्गावरही वाहने कुठे ठेवावी, हा प्रश्न निर्माण होतो. आर्वी नाका चौकासह मुख्य मार्ग, बॅचलर रोड व अन्य मार्गांवरही वाहने रस्त्याच्या कडेला तथा कधी रस्त्यावरच पार्क करावी लागतात. परिणामी, वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहतूक पोलिसांचे सध्या या प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचेच दिसून येत आहे. शहरात पार्किंगची व्यवस्था करीत वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
भरधाव दुचाकी ठरताहेत अपघातास कारण
शहरातील मुख्य मार्गासह अन्य मार्गांवरही दुचाकी चालकांकडून वाहतुकीच्या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असल्याचे दिसून येते. गत काही दिवसांत तर बजाज चौक या मुख्य ठिकाणीही दुचाकींवर ट्रीपल सिट बसवून वाहतूक केली जात असल्याचे दिसून येते. मंगळवारी भर दुपारीच बजाज चौकातून विद्यार्थी, युवक दुचाकीवर ट्रीपल सिट जाताना दिसून आले. मंगळवारी बजाज चौक परिसरात एकही वाहतूक पोलीस दिसत नव्हता. याचाच फायदा हे दुचाकी चालक घेत असावेत. शहराच्या अन्य भागातही दुचाकीवरून तिघे जातानाचे चित्र नित्याचे झाले आहे. शिवाय भरधाव दुचाकींमुळे मुख्य मार्गावरील अपघात नित्याचेच झाले आहेत. परिणामी, वृद्ध, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.