एसटीकडून प्रवाशांना एक रुपयात मिळते दहा लाख रुपयांचे विमा कवच !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 06:00 PM2024-12-11T18:00:45+5:302024-12-11T18:02:10+5:30
सुरक्षित प्रवासाला प्राधान्य : जखमींनाही मिळते मदत
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुरक्षित प्रवासासाठी बसला प्राधान्य दिले जाते. परिवहन महामंडळाच्या एसटी अपघातात कोणाचा मृत्यू झाला तर १० लाखांपर्यंत भरपाई मिळते. तर जखमींना गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी असल्यास त्याला नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाते.
राज्य परिवहन महामंडळाची एसटी ही गेल्या सात दशकांहून अधिक वर्षांपासून प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहे. एसटीचे हे वेगळेपण जसे आहे तसेच आणखी एक वेगळेपण पण एसटीने कधीही या पेशाकडे व्यवसाय म्हणून पाहिले नाही. 'प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्य जोपासत असताना प्रवासी हिताला, प्रवासी सुरक्षेला सर्वप्रथम प्राधान्य दिले आहे. एसटीचे चालक-वाहक हे प्रशिक्षित असतात. त्यामुळे एसटीला अपघात झाल्याच्या घटना फारच कमी आहेत. त्यातूनही एखादी दुर्घटना घडलीच तरी एसटीतील मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाच्या वारसांना तब्बल १० लाखांची नुकसान भरपाई दिली जाते.
१ लाख ३५ हजारांची मदत
जिल्ह्यात बसच्या अपघातात जखमी झालेल्यांना आतापर्यंत एसटी महामंडळाकडून निकषा- नुसार एक लाख ३५ हजार ८३४ रुपयांची मदत प्रवाशांना केली आहे.
जखमी प्रवाशांनाही मदतीचा हात
अनेकदा एसटीच्या अपघातामुळे प्रवासी किंवा बाहेरील व्यक्ती जखमी होण्याच्या घटना घडतात. अशावेळी एसटीकडून संबंधित जखमींवर उपचार केले जातात. त्यासाठी लागणारा खर्च दिला जातो. तसेच दवाखान्यात जाण्यासाठी प्रवासात सवलतही दिली जाते.
कोणाला मिळते मदत?
एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू झालेला असल्यास मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे वारसदार किंवा एसटीच्या धक्क्यामुळे रस्त्यावरील सायकलस्वार, पादचारी, बैलगाडी चालक, घोडेस्वार यांचा मृत्यू झालेला असल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसाला ही रक्कम दिली जाते.
तिकिटातल्या १ रुपयात १० लाखांचा विमा
एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी विविध योजनांतून सवलत दिली जाते. मग त्या महिला असो वा ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी असो वा कामगार सर्वांसाठी प्रवासात सवलती दिल्या आहेत. शिवाय बसमधून प्रवास करताना काढलेल्या तिकिटात एक रुपयात १० लाख रुपयांचा विमा कवचही दिला जातो.
सुरक्षित प्रवासाची एसटीकडून हमी
- एसटी महामंडळाकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. त्याला कारणही तसेच आहे.
- एसटीच्या चालकांना सक्त सूचना असतात.
- त्यामुळे कोणत्याही पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यास कधीही एसटी पाण्यात घातली जात नाही.
- जवळच्या बसस्थानकात नेऊन लावली जाते.
- एसटी चालक-वाहकांना आठ ते दहा तासांचीच ड्यूटी लावली जाते. त्यामुळे कामाचा ताण ही बाब फारशी उरत नाही.
बसचा अपघात झाल्यास याप्रमाणे मिळते मदत
- जखमी झाल्यास ५ लाख
- मृत्यू झाल्यास १० लाख
- अपंगत्वास १ ते २.५ लाख
११ महिन्यांत एसटीचे ३६ अपघात
जानेवारी २०२४ ते नोव्हेंबर २०२४ या अकरा महिन्यांच्या कालावधीत वर्धा विभागात एकूण ३६ अपघात झाले. यात २ जणांना मृत्यू झाला. १८ जण गंभीर जखमी, तर १६ जण किरकोळ जखमी झाले.
"एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मृत्यू झाल्यास तसेच जखमी झाल्यास त्यांना अपघाती मदत केली जाते. मात्र एसटी आणि इतर वाहनात अपघात झाल्यास यात नियमानुसार मदत केली जाते. एसटी अपघात फार क्वचित होतात."
- प्रताप राठोड, विभागीय नियंत्रक, एसटी महामंडळ, वर्धा.