भरदुपारी काळोखात रुग्ण तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 05:00 AM2021-10-18T05:00:00+5:302021-10-18T05:00:16+5:30
रविवारी या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करतात. पण, रविवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भर दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागात काळोख पसला होता. विद्युत पुरवठा खंडित होताच रुग्णालयातील जनरेटर सुरू करून विद्युत पुरवठा वेळीच सुरू करणे क्रमप्राप्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरी व ग्रामीण भागातील गरीब व गरजूंसाठी फायद्याचे ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कारभार सध्या जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दुर्लक्षित धोरणामुळे वाऱ्यावरच असल्याचे चित्र सध्या बघावयास मिळत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन जनरेटर असतानाही कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना रविवारी भर दुपारी चक्क काळोखात रुग्ण तपासणी करावी लागल्याचे वास्तव आहे. या संपूर्ण प्रकाराला जिल्हा शल्य चिकित्सकांचे निगरगठ्ठ धोरण कारणीभूत असल्याची चर्चा होत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांची तातडीने इतर ठिकाणी बदली करण्याची मागणी आहे. शासकीय सुटीचा दिवस असलेल्या रविवार जिल्हा सामान्य रुग्णालयाचा प्रसूती विभाग व अतिदक्षता विभागातून नागरिकांना आरोग्य सेवा दिली जाते. रविवारी या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करतात. पण, रविवारी दुपारी २.१५ वाजताच्या सुमारास अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने भर दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध विभागात काळोख पसला होता. विद्युत पुरवठा खंडित होताच रुग्णालयातील जनरेटर सुरू करून विद्युत पुरवठा वेळीच सुरू करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, ज्याच्याकडे जनरेटर सुरू करण्याची जबाबदारी आहे तोच कर्मचारी रुग्णालयात नसल्याने कार्यरत डॉक्टरांना काळोखातच मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत रुग्ण तपासणी करावी लागली. तर रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
साहेब असते तर ही परिस्थिती नसतीच...
- जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देणारे डॉ. अनुपम हिवलेकर यांचे निधन झाले. पण ते जिवंत असताना त्यांचे रुग्णालयातील प्रत्येक सेवा-सुविधांकडे बारकाईने लक्ष राहायचे. कुठलीही तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास ते स्वत: पुढाकार घेत ती समस्या निकाली काढायचे. रविवारी भरदुपारी चक्क मोबाईलच्या टॉर्चचा आधार घेत रुग्ण तपासणी सुरू असताना ‘हिवलेकर साहेब असते तर ही परिस्थिती ओढावलीच नसती’ अशी चर्चा रुग्णालयात होती.
तीन जनरेटर नावालाच
- जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन जनरेटर कार्यान्वित आहेत. पण, रविवारी दुपारी विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर जनरेटर सुरू न करण्यात आल्याने संपूर्ण रुग्णालयात भरदुपारीच काळोख पसरला होता.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्या दुर्लक्षित व हेकेखोर धोरणामुळे रुग्णांना, रुग्णांच्या नातेवाईकांना, तसेच कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालकमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेत डॉ. सचिन तडस यांची इतर ठिकाणी बदलीचा प्रस्ताव शासनाला पाठवावा. अन्यथा सीएसच्या दुर्लक्षित धोरणाच्या निषेधार्थ पोरक्या झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात मुंडन आंदोलन करण्यात येईल.
- निहाल पांडे, संस्थापक अध्यक्ष, युवा परिवर्तन की आवाज, वर्धा.