पिंपळझरी बेचिराख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 10:23 PM2018-02-13T22:23:18+5:302018-02-13T22:23:46+5:30
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पहिल्या दिवशी केवळ पाऊस आल्याने नागरिकांना आपण गारपिटीच्या तडाख्यातून सुटलो असे वाटत असतानाच सोमवारी दुपारी पुलगाव आणि आर्वी परिसराला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.
ऑनलाईन लोकमत
वर्धा /रोहणा : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून वादळी पावसाने चांगलेच थैमान घातले आहे. पहिल्या दिवशी केवळ पाऊस आल्याने नागरिकांना आपण गारपिटीच्या तडाख्यातून सुटलो असे वाटत असतानाच सोमवारी दुपारी पुलगाव आणि आर्वी परिसराला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला. या भागात सुमारे अर्धा तास गार पडल्याने हिरवी शेती, काळी जमीन आणि रस्ते गारांची आच्छादल्याचे दिसून आले. या गारांच्या माऱ्यामुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले. समुद्रपूर तालुक्यातील पारोधी येथे वीज कोसळल्याने गाय व बैलाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी गारपीट झाल्यानंतर सांयकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रोहण्यालगतच्या पिंपळझरी गावाला चांगलाच तडाखा बसला. येथील नागरिकांच्या घरावरील छत उडाली. अनेकांच्या भिंती कोसळल्या, तर आकोली भागात झाडे उन्मळून पडली. या नुकसानीच्या भपाईकरिता नागरिक रस्त्यावर आले. वर्धेत दिवसभर पावसाची हजेरी होती. मात्र रात्री पावसासह आलेल्या गारांमुळे सर्वांनाच भांबावून सोडले.
१२ फेब्रुवारीची सायंकाळ रोहणा परिसरात पिंपळझरी गावाकरिता काळच ठरली. यावेळी अचानक आलेल्या पावसासह वादळी वारा आणि गारपीटीमुळे हे गाव पुरते उद्ध्वस्त झाले. गावातील सर्वच घरांची मोडतोड होवून साहित्य अस्ताव्यस्त झाले. पाच-सात व्यक्तीं व जनावर जखमी झाले. विद्युत खांब उन्मळून पडल्याने ग्रामस्थांना काळोखाचा सामना करावा लागला.
रोहणा परिसरातील रोहणासह मारडा, सालदरा, वाई, बोदड, बोथली या गावांना गारपीटीने अक्षरश: झोडपून काढले. यात पिंपळझरी या आदिवासी बहुल गावाला जबरदस्त फटका बसला. आज या गावात राहण्याकरिता घर व जेवणासाठी अन्न नसल्याचे चित्र आहे. गावात कोलाम या आदिवासी समाजाची ४५ ते ५० घरे आहेत. ही सर्व घरे उडून गेलीत. घरातील साहित्य अस्ताव्यस्त झाले. प्रभाकर राड्डी, चंद्रमुखी राड्डी, दिवाकर शिरबंदी, निर्मला शिरबंदी, हरिदास राड्डी, दिनेश कुंडी, दमडू घरगडी यांच्यासह त्यांची जनावरे जखमी झाली. गावात सर्वत्र आक्रोश आहे. शेतातील गहू, चणा, कापूस ही पूर्णत: नष्ट झाली आहे. सदर घटना समजताच सामाजिक कार्यकर्ते माजी जि.प. सदस्य तथा विद्यमान जि.प. सदस्य ज्योती निकम यांचे पती गजानन निकम यांनी पिंपळझरी येथील संपूर्ण गावकऱ्यांची जेवणाची व्यवस्था केली. तर रोहणा येथील सकस आहार या वस्तीतील नागरिकांना ब्लँकेट वाटप केले. जखमींना आर्वी येथील दवाखान्यात पाठविण्यासाठी माजी सरपंच गणेश गजकेश्वर यांनी धावपळ केली. पीडितांना सहकार्य करण्यासाठी पिंपळधरीच्या सरपंचा चंदा दौलत कुंडी, रोहण्याचे सरपंच सुनील वाघ, माजी जि.प. सदस्या तृप्ती पावडे, आर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र पावडे यांनी सहकार्य केले. शासनातर्फे नायब तहसीलदार मस्के यांनी गावाला भेट दिल्याचे समजले. दुसऱ्या दिवशी सकाळी तलाठी ऐकापुरे घटनास्थळी येवून नुकसानीची पाहणी करीत होते.
देवळी तालुक्याला सर्वाधिक फटका
नाचणगाव - सोमवारी सायंकाळी झालेल्या गारपीटीचा फटका देवळी तालुक्यातील सेंदरी, सोनोरा, कांदेगाव, इंझाळा, नाचणगाव, आपटी, वाघोली, विजयगोपाल, कोळोणा या गावांना मोठ्या प्रमाणात बसला. य गारपीटीमुळे गहू, चना व इतर भाजीपिकांना चांगलाच फटका बसला. खरीप पाठोपाठ रबी हंगामानेही शेतकऱ्यांच तोंडचा घास नैसर्गिक आपत्तीमुळे हिसकावून नेल्याने तो हवालदिल झाला. तालुक्याला बसलेल्या गारींच्या फटक्याची पाहणी खासदार रामदास तडस यांनी सेंदरी या गावाला भेट देत केली.
पक्ष्यांनाही गारांचा मारा
या गारपिटीचा तडाखा शेतशिवारांसह पक्ष्यांनाही बसला आहे. गारांच्या माऱ्यामुळे अनेक पक्षी गंभीर जखमी झाले तर काहींना प्राण गमवावे लागले आहे.