पं.स. इमारतीला यंदाही ताडपत्रीचा आधार
By admin | Published: June 2, 2017 02:08 AM2017-06-02T02:08:45+5:302017-06-02T02:08:45+5:30
सेलू तालुक्यातील ६२ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या गावांचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समितीला मागील कित्येक वर्षांपासून इमारतच मिळेणा झाली आहे.
कार्यालयाची व्यथा : पहिल्याच पावसाने गळती
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : सेलू तालुक्यातील ६२ ग्रा.पं. अंतर्गत येणाऱ्या गावांचा कारभार पाहणाऱ्या पंचायत समितीला मागील कित्येक वर्षांपासून इमारतच मिळेणा झाली आहे. परिणामी, जुन्याच इमारतीची वारंवार डागडुजी केली जात असून प्रत्येक पावसाळ्यात ताडपत्री आच्छादली जाते. यंदाही येथील पंचायत समितीला ताडपत्रीचाच आधार असल्याचे दिसून येते.
६२ ग्रा.पं. चा कारभार पंचायत समिती कार्यालयातून चालतो. सध्या त्या पं.स. लाच इमारत नाही. यावर्षीही पंचायत समितीच्या इमारतीला पावसाळा लागताच ताडपत्रींचे पांघरून घेण्याची वेळ आली आहे. या इमारतीला ‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील तीन वर्षांपासून ही इमारत ताडपत्रीचा आधार घेत आहे. बुधवारी आलेल्या दमदार पावसामुळे ही इमारत गळू लागली आणि कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. पंचायत, कृषी, आस्थापना विभागातील संगणक खराब होऊ नये म्हणून अधिकारी, कर्मचारी काळजी घेत होते. पंचायत विभागात गुरूवारी सकाळी तळे साचून असल्याचे पाहावयास मिळाले. बुधवारी पंचायत समिती कार्यालयाला गळती लागल्याने गुरूवारी सकाळपासूनच ताडपत्री टाकण्याचे काम सुरु करण्यात आल्याचे दिसून आले.
तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकास कामे सुरु असल्याचा गवगवा केला जात आहे; पण या इमारतीवरील फुटलेले कवेलू बदलण्यासही निधी मिळू नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. सेलू तालुक्यातील जीर्ण शासकीय इमारतींकडे लोकप्रतिनिधी तथा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.