सेवाग्राममध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन; दशपर्णी अर्क ठरतोय प्रभावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 12:42 PM2020-08-01T12:42:47+5:302020-08-01T12:44:43+5:30
सेवाग्राम आश्रमातील सेंद्रिय शेती आता इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. येथील दशपर्णी अर्क उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बियाण्यांसह खतांच्या किंमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ आणि त्या तुलनेने हमीभावातील अत्यल्प वाढ, ही बाब शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट बिघडविणारी आहे. तसेच कोरोनाच्या प्रकोपामुळे खतांचाही तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळताना दिसत आहे. स्वदेशी आणि स्वावलंबनाचा मंत्र देणाऱ्या सेवाग्राम आश्रमातील सेंद्रिय शेती आता इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी ठरत आहे. येथील दशपर्णी अर्क उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे.
भरघोस उत्पादनाच्या लोभापायी रासायनिक खते व कीटकनाशांचा वापर वाढला. परिणामी, जमिनीसह नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होत आहे. आरोग्याच्या परिणामांमुळे आता सेंद्रिय शेतीकडे कल वाढत आहे. सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आश्रमात सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेती केली जाते. फवारणीकरिता कीटकनाशके न वापरता विविध अर्कांचा वापर केला जातो. या अर्कनिर्मितीची सर्व प्रक्रिया आश्रमातच केली जाते. आश्रम परिसरातील दहा झाडांची पाने गोळा करून त्यापासून अर्क तयार केला जात असल्याने त्याला दशपर्णी अर्क म्हणतात. आश्रमच्या शेतीत सर्व प्रकारचे धान्य आणि भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. यावर कीड, अळ्यांचा प्रादुर्भाव होत असल्याने दशपर्णी अर्काची फवारणी करून रोगावर नियंत्रण मिळविले जाते. येथे कोणतीही औषधी किंवा अर्क बाजारातून विकत घेतला जात नाही. या सेंद्रिय शेतीचा प्रचार-प्रसार होत असल्याने शेतकऱ्यांचाही कल वाढत आहे.
असा तयार होतो दशपर्णी अर्क
सेवाग्राम आश्रमात दशपर्णी अर्क तयार करण्याची लगबग सुरू आहे. यामध्ये धोत्रा, बेल, येरंडी, घंटुला, रुई, कडूनिंब, अडुळसा, बेशरम, करंज व निलगिरी या दहा झाडांची पाने गोळा केली जातात. यामध्ये दहा लिटर गोमूत्र, पाच लिटर पाणी यांचे एका ड्रममध्ये द्रावण तयार करून त्यात या सर्व झाडांची पाने टाकली जातात. पंधरा दिवस ठेवल्यानंतर गाळून त्याचे द्रावण फवारणीकरिता उपयोगात आणले जाते. एका फवारणी पंपासाठी शंभर मि.ली. अर्क वापरल्याने रोगावर नियंत्रण मिळविता येते.
आश्रमात बहुगुणी झाडांची उपलब्धी
आश्रमामध्ये सर्व प्रकारची झाडे आहेत. ही झाडे आयुर्वेदिक असून देशी असल्याने बहुगुणी आहेत. याचा उपयोग आरोग्यासाठी महत्त्वाचा असल्याने कुठलेही दुष्परिणाम यातून होत नाही. दशपर्णीच्या फवारणीमुळे पिकांवर आणि उत्पादनावर रासायनिक खते व कीटकनाशकासारखे परिणाम दिसून येत नाही. त्यामुळेच आश्रमातील उत्पादनांची मागणी वाढली आहे. अर्क बनविण्यासाठी शेती विभागप्रमुख नामदेव ढोले, आकाश लोखंडे, सचिन हुडे, मार्गदर्शिका संगीता चव्हाण, अश्विनी बघेल, दीपाली उंबरकर, माधुरी चांभारे व सचिन बहादुरे आदी सहकार्य करीत आहेत.
आश्रमाकडे सध्या ८० एकर शेती असून त्यापैकी ३४ एकर शेती ठेक्याने दिली आहे, तर उर्वरित शेतीमध्ये विविध पिके घेतली जात आहेत. सुरुवातीपासूनच सेंद्रिय शेती केली जात आहे. यामध्ये लागणारे गोमूत्र, शेणखत आणि झाडांची पाने आश्रम परिसरातच उपलब्ध होत असल्याने लागणारा खर्च अत्यल्प आहे. सेंद्रिय शेतीतून शेतकरी चांगल्याप्रकारे उन्नती साधू शकतो.
मुकुंद मस्के, मंत्री, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान