हिंगणघाट (वर्धा) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील आंतरवली सराटी गावात मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा दर्जा मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. याच्या निषेधार्थ शनिवारी १२ वाजता जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख नीलेश धुमाळ, रूपेश कांबळे यांच्या सूचनेनुसार कारंजा चौकात आंदोलन करण्यात आले.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात २९ ऑगस्टपासून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा दर्जा मिळण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू होते. उपोषणाच्या कालावधीत त्यांचे आरोग्य बिघडल्याचे दाखवून प्रशासनाने उपोषण दडपण्याचा प्रयत्न केला. मराठा समाजाने त्यानिमित्त धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको केला. त्यांच्या आंदोलनाला सरकारने पिटाळून लावण्यासाठी सरकारने लाठीचार्ज करून मराठा समाजातील आंदोलनाला हिंसक वळण देत लाठ्या काठ्यांनी मारून आंदोलकांना जखमी केले. या घटनेच्या निषेधार्थ उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खुपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, शहरप्रमुख सतीश ढोमणे, माजी नगराध्यक्ष सुरेश मुंजेवार, अभिनंदन मुनोत यांच्या नेतृत्वात कारंजा चौकात राज्य सरकारचा निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले.