देशात राममंदिर बनलं, पण ‘साधराम’ असुरक्षितच! प्रवीण तोगडिया
By रवींद्र चांदेकर | Published: March 21, 2024 07:29 PM2024-03-21T19:29:16+5:302024-03-21T19:29:49+5:30
हिंदूंच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत साधला संवाद
आनंद इंगोले, वर्धा: देशामध्ये सातत्याने हिंदूंवर अन्याय होत आहे. छत्तीसगडमधील कवरझा येथील ‘साधराम’ नामक हिंदू व्यक्तीचा गळा कापण्यात आला. असाच प्रकार इतरही राज्यात सुरू असून, आजही देशात हिंदू असुरक्षितच आहे. एकीकडे देशामध्ये राममंदिर बांधण्यात आले, पण 'साधराम' असुरक्षित आहे, असे मत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
एका बैठकीच्या निमित्ताने ते वर्धेत आले होते. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात यासह इतरही ठिकाणी हिंदूंची हत्या केली जात आहे. त्या रोखण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देशात जिहादींची हिंमत वाढत असल्यामुळे हिंदूंना अन्यायाचा सामना करावा लागत आहे. सरकार कुणाचे आहे, हा प्रश्न नाही. भाजपाचे सरकार असो वा काँग्रेसचे सरकार असो, यात सरकार आपली भूमिका पार पाडत आहे. ते योग्य पावले उचलून कारवाई करीत आहे. या प्रकाराला केवळ जिहादी दोषी असून त्यांचा निपटारा करण्यासाठी हिंदू राष्ट्र निर्मितीची आवश्यकता असल्याचेही डॉ. प्रवीण तोगडिया म्हणाले.
ज्याप्रमाणे देशात विकासकामे करण्याकरिता शासनाची जिल्हा विकास यंत्रणा ‘डीडीओ’ कार्यरत असते, त्याचप्रमाणे हिंदूंच्या विकासाकरिता आमची ‘एचडीओ’ हनुमान चालिसा विकास यंत्रणा कार्यरत आहे. यातून गावापासून तर शहरापर्यंत प्रत्येक भागात कार्य करून हिंदूंना समृद्ध करण्याचे काम करीत आहे. देशभरात आतापर्यंत १२ हजार हनुमान चालिसा केंद्र स्थापन केले असून ते कार्यरत आहे. यामध्ये आणखी वाढ करण्याचे प्रयत्न असल्याचेही डॉ. प्रवीण तोगडिया यांनी सांगितले. पत्रपरिषदेला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष मोतीलाल चौधरी, विदर्भ प्रांतमंत्री योगेश गायकवाड, राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांताध्यक्ष अनुप जयस्वाल आदींची उपस्थिती होती.