३५३ शाळांचा शाळा सुरू करण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 05:00 AM2020-06-30T05:00:00+5:302020-06-30T05:00:18+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्वांकडून अधिक चिंता व्यक्त होत होती. त्यानुसार राज्य शासनाने जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचे आदेश काढले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : विदर्भातील शाळा दरवर्षी २६ जूनपासून सुरू होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे नवीन शैक्षणिक सत्रावर विरजण पडले. दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे शाळा व्यवस्थापन समितीने मंजुरी दिल्यानंतरच शाळा सुरू करण्याचा शासनाने निर्णय दिल्याने जिल्ह्यातील १ हजार २९४ शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. त्यापैकी ९४१ ठिकाणी झालेल्या सभेत शाळा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले असून ३५३ शाळांनी मात्र, शाळा सुरू करण्यास नकार दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत तीन महिन्यांपासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. यंदा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या नाहीत. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना सर्वांकडून अधिक चिंता व्यक्त होत होती. त्यानुसार राज्य शासनाने जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचे आदेश काढले. मात्र, शालेय सत्र चालविण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा विचार करून निर्णय घेण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीला दिली.
त्यानुसार २६ जून रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची सभा पार पडली. यात व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह सरपंच, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, तालुका आरोग्य अधिकारी, लोकप्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
जिल्ह्यातील १ हजार २९४ शाळांमध्ये झालेल्या बैठकीत ३५३ शाळांनी शाळा सुरू करण्यास नकार दिला असून ९४१ शाळांनी शाळा सुरू करण्यावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी दिली.
कोरोनाचा फैलाव बघता पालकही आपल्या पाल्यांना शाळांमध्ये पाठवतील की नाही, याबाबत साशंकताच आहे. तरी पुढील निर्णय व्यवस्थापन समिती घेणार आहे.
शिक्षकांमधील संभ्रम कायमच
१५ जुन्या शासन परिपत्रकात विद्यार्थ्यांसाठी शाळा भरविण्याचे वेळापत्रक देण्यात आले. परंतु, शिक्षकांनी मात्र नेमके कधी शाळेत जावे, याबाबत कोणत्याही स्पष्ट सूचना नाहीत. शिवाय गटशिक्षणाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे एका पत्राद्वारे सुचविले आहे. परिपत्रकातील तरतूदी लक्षात घेता काही पं.स.च्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांना दररोज १० ते ५ या कालावधीत उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या असल्याने शिक्षकांमध्ये शाळा सुरू करण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील १,२९४ शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची बैठक
२६ जून रोजी शाळेचा पहिला ठोका पडला नसला तरी जिल्ह्यातील एक हजार २९४ शाळांमध्ये व्यवस्थापन समितीची सभा पार पडली. बैठकीत विविध विषायांसह शाळा सुरू करण्याबाबत विचारमंथन करण्यात आले. काही शाळा सुरू करण्याबाबत होकार देण्यात आला असला तरी पालक पाल्यांना शाळेत पाठवतील का, हा प्रश्न आहे.