प्रकल्प कार्यालयासह लीजची समस्या निकाली काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2022 10:10 PM2022-10-02T22:10:43+5:302022-10-02T22:11:29+5:30
महाविकास सरकारच्या काळात या कार्यालयाला हक्काची जागा मिळाली नाही. आदिवासी प्रकल्प कार्यालयाला वर्ध्यात हक्काची जागा देण्यासह रामनगर लीजची समस्या निकाली काढण्यात येईल. शिवाय वर्ध्यातील महिलांना उद्योग उभारण्यासाठी राज्य शासन आर्थिक बळ देईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्ध्यातील आदिवासी बांधवांची समस्या लक्षात घेऊन वर्धा येथे आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय देण्यात आले; पण महाविकास सरकारच्या काळात या कार्यालयाला हक्काची जागा मिळाली नाही. आदिवासी प्रकल्प कार्यालयाला वर्ध्यात हक्काची जागा देण्यासह रामनगर लीजची समस्या निकाली काढण्यात येईल. शिवाय वर्ध्यातील महिलांना उद्योग उभारण्यासाठी राज्य शासन आर्थिक बळ देईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
गांधी जयंतीचे औचित्य साधून जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित ‘हॅलो’ऐवजी ‘वंदे मातरम्’ तसेच ७५ नद्यांची परिक्रमा या उपक्रमांचा शुभारंभ, तर आ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचा समारोप आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे वन व सांस्कृतिक कार्य, तसेच मत्स्य व्यवसायमंत्री सुधीर मुनगंटीवार, महसूल व पशुसंवर्धन, तसेच दुग्ध विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह, खा. रामदास तडस, आ. रामदास आंबटकर, आ. पंकज भोयर, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
ना. फडणवीस पुढे म्हणाले, नदींची परिक्रमा हा उपक्रम राज्याचा महत्त्वाकांशी उपक्रम असून, या उपक्रमाच्या माध्यमातून नद्यांशी पुन्हा एकदा नाते पुनरुज्जीवित होणार आहे. शिवाय राज्यातील नद्या अमृत वाहिन्या होतील. राज्यातील ३६ जिल्ह्यांत त्या- त्या जिल्ह्याची माहिती असणारे गॅझेट निघणार असून, त्याची सुरुवात वर्ध्यातून झाली आहे. ‘वंदे मातरम्’ हा स्वातंत्र्यलढाचा मूलमंत्र होता आणि आज ‘हॅलो’ नाही ‘वंदे मातरम्’ या उपक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपित्यांच्या कर्मभूमीतून झाल्याचे याप्रसंगी ना. फडणवीस यांनी स्पष्ट केले.
गरजूंना दिला शासकीय योजनांचा लाभ
- कार्यक्रमादरम्यान माला दिवाकर मेश्राम व सुमित्रा शंकर लोहकरे यांना घरपट्ट्याचे वाटप करण्यात आले, तर मंदा चंद्रप्रकाश विघणे यांना जमिनीचा हक्क देण्याबाबतचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
- शिवाय राजू भगवान कुत्तरमारे यांना आयुष्मान कार्ड, तसेच श्रीरंग महादेव शेंडे यांना शासकीय योजनेंतर्गत ट्रॅक्टरचे वितरणही करण्यात आले.
उल्लेखनीय कार्याचा झाला गौरव
- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा कार्यक्रमादरम्यान सत्कार करण्यात आला. शिवाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे, महावितरणचे अधीक्षक अभियंता अशोक सावंत, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासन विभागाचे मनोजकुमार शहा, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख प्रमोद थुटे, वास्तुविशारद चित्तलवार यांचाही कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दिव्यांगांना वितरित केले विविध साहित्य
- जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर पोहोचल्यावर मान्यवरांनी सुरुवातीला प्रदर्शनीची पाहणी केली. त्यानंतर दिव्यांग बांधवांना विविध साहित्याचे वाटप केले. सदर साहित्य खासदार निधीअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
गायक नंदेश उमक अन् बेला शेंडे यांनी सादर केली एकापेक्षा एक गीत
- जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमातच प्रसिद्ध गायिका बेला शेंडे, तसेच शाहीर तथा गायक नंदेश उमक यांनी एकापेक्षा एक देशभक्तिपर गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले, तर उपस्थितांचे आभार जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी रोहन घुगे यांनी मानले.
जलनायकांना दिला कलश अन् राष्ट्रध्वज
- ७५ नद्यांची परिक्रमा हा महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाकांशी उपक्रम असून, नदी परिक्रमा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका राहणाऱ्या ११० जलनायकांना क्रीडा संकुलाच्या मैदानावरील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कलश आणि राष्ट्रध्वज देण्यात आला. हे जलनायक त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या नदीची माहिती जाणून घेत राज्यातील ७५ नद्या अमृतवाहिनी व्हावी यासाठी काय करावे लागेल याबाबतचा सूक्ष्म आराखडा तयार करून तो राज्य शासनाला सादर करणार आहेत. त्यानंतर प्रत्यक्ष काम होणार आहे.