खऱ्या पे्रमात त्यागाची भूमिका महत्त्वाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 11:20 PM2018-02-07T23:20:13+5:302018-02-07T23:20:24+5:30
ज्यांना पे्रमाची खरी व्याख्या कळते, त्यांनाच प्रेम करण्याचा नैतिक अधिकारी असतो. खऱ्या प्रेमामध्ये त्यागाची भूमिका फार मोठी असते. आणि ज्यांना त्याग करायला जमतं त्यांनाच जीवनामध्ये खरं प्रेम लाभते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ज्यांना पे्रमाची खरी व्याख्या कळते, त्यांनाच प्रेम करण्याचा नैतिक अधिकारी असतो. खऱ्या प्रेमामध्ये त्यागाची भूमिका फार मोठी असते. आणि ज्यांना त्याग करायला जमतं त्यांनाच जीवनामध्ये खरं प्रेम लाभते. आपल्याला जगातील सर्व विचारवंतानी, महापुरूषांनी, तत्ववेत्यांनी एकमेकांवर प्रेम करावयाची शिकवण दिली. पण प्रेम करत असताना त्या प्रेमाचा अर्थही नीट कळायला हवा, असे प्रतिपादन कवी प्रकाश घोडके यांनी केले.
यशवंत महाविद्यालयात आयोजित काव्य मैफीलीच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. त्यांनी ‘प्रेम’ या आशयावर सरस आणि दर्जेदार कविता सादर करून विद्यार्थ्यांना प्रेमाचा खरा अर्थ समजावून सांगितला. मराठी विभागाच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. वीरेंद्र बैस होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. डॉ. न. ह. खोडे, प्रा. प्रमोद नारायणे यांची उपस्थिती होती. ‘तुझ्या येण्याला वेळ नसते’, ‘असा बावळा सावळा’, ‘उभा जन्म झाला उन्हाळ उन्हाळ’, ‘तुझे ओठ ताजे जसा पावसाळा’ या सारख्या कसदार अशा कविता सादर करून कवी प्रकाश घोडके यांनी उपस्थितांची मने जिंकली.
शिवाय ‘तुझ्या दाराहून जाता, डोळे अडले दारात, अनं तुझ्या डोईचा पदर, नीट राहिना वाºयात’, ‘गढुळल्या दाही दिशा, कडू झाली सारी वाणी, अरे आता धुवून वापरा, घरी पावसाचे पाणी’ या कविता सादर करून कवी प्रकाश घोडके यांनी उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. न.ह. खोडे यांनी प्रास्ताविकातनू विद्यार्थ्यांना कवितेचे महत्व पटवून दिले. शिवाय त्यांनी व्यासपीठावर उपस्थित पाहुण्यांना परिचय करून दिला. कार्यक्रमाचे संचालन गौरव तामगाडगे यांनी केले तर आभार प्रा. उमा खनाडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.
‘खुळा जीव माझा तुला साद घाली’ ला मिळाला भरभरून प्रतिसाद
खुळा जीव माझा तुला साद घाली, उभा कृष्ण मेघांचा नेत्र भार झेली. तुला पाठमोरी किती वेळ पाहू, नको आज वेडे अशी दूर राहू, या सरस कवितेला उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी टाळ्यांची साथ देऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कवीने एकापेक्षा एक सरस कविता सादर करून उपस्थितांचे मने जिंकली.