स्व. वामनराव दिवे ट्रस्ट देणार पाच हजार महिलांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 09:55 PM2018-10-15T21:55:59+5:302018-10-15T21:56:29+5:30

चूल आणि मुल सांभाळून कुटूंबाला आधार देणारी आणि मुल्याधिष्ठीत समाज घडविण्याकरीता मोलाचा घटक असलेली ग्रामीण भागातील स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, स्वावलंबी व्हावी या प्रामाणिक हेतूने आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील महिलांकरिता मोफत शिवणकला प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे.

Self Wamanrao Dive Trust will give training to five thousand women | स्व. वामनराव दिवे ट्रस्ट देणार पाच हजार महिलांना प्रशिक्षण

स्व. वामनराव दिवे ट्रस्ट देणार पाच हजार महिलांना प्रशिक्षण

Next
ठळक मुद्देसुधीर दिवे : तीन तालुक्यात मोफत शिवणकला प्रशिक्षणाचा उपक्रम राबविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : चूल आणि मुल सांभाळून कुटूंबाला आधार देणारी आणि मुल्याधिष्ठीत समाज घडविण्याकरीता मोलाचा घटक असलेली ग्रामीण भागातील स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी, स्वावलंबी व्हावी या प्रामाणिक हेतूने आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील महिलांकरिता मोफत शिवणकला प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. या माध्यमातून पाच हजार महिलांना प्रशिक्षित करण्याचा मानस आहे अशी माहिती स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टचे मार्गदर्शक व केंद्रीय जलसंधारण मंत्री यांचे विशेष सल्लागार सुधीर दिवे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
दिवे पुढे म्हणाले की, होतकरू आणि गरजूंकरिता हा उपक्रम अंत्यत उपयुक्त असून आर्वीसह परिसरातील महिलांच्या आर्थिक उन्नतीचा विचार करून, प्रत्येकाच्या हाताला काम व योग्य दाम हे ब्रीद मानून हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेच्या या युगात ग्रामीण भागात स्वयंरोजगार निर्मिती करून आर्थिक सुबत्ता आणल्याशिवाय आता पर्याय नाही. यासाठी कौशल्य विकासाला प्राधान्य, ज्या व्यक्तीला ज्या क्षेत्रात रूची आहे, त्या क्षेत्राचे ज्ञान प्राप्त करून देणे ही आपला सामाजिक जबाबदारी आहे. त्यातून निश्चितच मोठा बदल अपेक्षित आहे. स्व. वामनराव दिवे ट्रस्टने हा छोटासा प्रयत्न केला आहे. चार केंद्रांमध्ये एकाच वेळी चार बॅचेसमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एका बॅचमध्ये केवळ ३० प्रशिक्षणार्थी राहतील. एका केंद्रामध्ये दिवसभरात १२० महिला सकाळी ८ ते १०, १० ते १२, १ ते ३ आणि ३ ते ५ या वेळात प्रशिक्षण घेतील. या प्रशिक्षणानंतर ज्यांना शिलाई मशीन घेवून स्वतंत्र व्यवसाय सुरू करावयाचा आहे. त्यांना बॅँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची व त्यावरील व्याज भरण्याची जबाबदारी देखील स्व. वामनराव दिवे ट्रस्टने स्विकारली आहे. प्रशिक्षणार्थींना मोफत साहित्य किट देण्यात येणार आहे हे विशेष.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश यानुसार कार्यशाळा चालणार असून, दररोज दोन तासांच्या या प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्याकरिता रहिवासी दाखला, आधार कार्ड किंवा विजेचे बिल व दोन फोटो सादर करावे लागतील असेही त्यांनी सांगितले.या वर्गांमध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी करीता दर दोन महिन्यानंतर एक लकी ड्रॉ काढण्यात येणार असून विजेत्यास शिलाई मशीन भेट देण्यात येणार आहे. यावेळी धनश्री दिवे, जयंत ढगे, विशाल गाडगे, अर्चना वानखडे, सोनाली कलोडे, चेतना मानमोडे, अनिल जोशी, भुतडा आदी उपस्थित होते.
२६ पासून उपक्रमाची सुरुवात
स्व. वामनराव दिवे चॅरिटेबल ट्रस्टच्या या उपक्रमांचा शुभारंभ २६ आणि २७ आॅक्टोबरला होणार आहे. तळेगाव येथे २६ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुंदडा कॉम्प्लेक्स येथे तर आर्वी येथे याच दिवशी दुपारी ३ वाजता करमरकर भवन, जुनी वर्धा नागरी बॅँक येथे उद्घाटन होणार आहे. तर आष्टी येथील केंद्राचे उद्घाटन २७ आॅक्टोबरला मेडीकल चौक गोलबाजार येथे सकाळी ११ वाजता तर कारंजा येथील कडवे कॉम्प्लेक्स, स्टेट बॅँकेसमोर या केंद्राचे उद्घाटन २७ आॅक्टोबरला दुपारी ३ वाजता होणार आहे. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून मंगेश चांदूरकर हे जबाबदारी सांभाळणार असून आर्वीकरीता सागर निर्मळ यांच्यासह मदत फाऊंडेशनच्या महिला विश्वस्त, कारंजा केंद्रासाठी सुनील इंगळे तर आष्टी केंद्रासाठी अशोक विजयकर हे समन्वयक राहणार आहेत.

Web Title: Self Wamanrao Dive Trust will give training to five thousand women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.