आंजी (मोठी) : मागील अनेक महिन्यांपासून ओळखपत्रच मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिकांकरिता राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकार मंत्रालयातर्फे अनेक वर्षांपासून उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मात्र शासनाच्या अधिकाऱ्यांमार्फत हा उपक्रम राबविताना कमालीचा निष्काळजीपणा केला जात आहे. त्यामुळे संबंधितांना ओळखपत्र देण्यास प्रचंड विलंब होतो. ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्राच्या भरवशावर अनेक शासकीय योजनांचा लाभ घेता येतो. परिवहन महामंडळाकडून एसटी प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत दिली जाते. पण अनेक लाभार्थ्यांना पाठपुरावा करुनही ओळखपत्रच मिळाले नसल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून मिळणाऱ्या योजनांच्या लाभापासून मुकावे लागत आहे. याशिवाय अन्य लाभही घेणे त्यांना अवघड होऊन बसले आहे. ओळखपत्राविषयी विचारणा करण्यास गेलेल्या संबंधितांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे आल्यापावलीच परतावे लागते. ओळखपत्रे तातडीने मिळावी याकरिता उपाययोजना करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुनील गफाट, राजू चामरे, देवराव गावंडे, गुलाब घोडखांदे, नरेश पोहाणे, युवाशक्ती संघटनेचे अध्यक्ष जाकीर शेख, धोंगडे, जयस्वाल, आत्राम, येवले तुरणकर, संजय जाधव, भालेराव आदींनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)
ओळखपत्रांविना ज्येष्ठ नागरिक लाभांपासून वंचित
By admin | Published: May 24, 2015 2:34 AM