लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वातंत्र्य चळवळीचे रणशिंग फुकणारा आणि चळवळीची बीजारोपण करणारा सेवाग्राम आश्रम जगभरातील गांधी अनुयायी आणि पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठिकाण व्हावे, यादृष्टीने आश्रमाला वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा मिळण्याची गरज आहे. शस्त्राशिवाय युद्ध जिंकू शकतो, हे सांगणाऱ्या महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमाचा जागतिक प्रेरणा केंद्र म्हणून लौकीक निर्माण करू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्धेकरांना दिला असून या आश्रमला लवकरच भेट देणार असल्याचेही सांगितले.महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीच्या सप्ताहनिमित्ताने सेवाग्राम विकास आराखड्यातील विकासकामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री सुनील केदार, जि.प. अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार रणजीत कांबळे, वित्त व नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रबर्ती, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे आदींची उपस्थिती होती. महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री आणि विनोबा भावे यांना अभिवादन करुन मुख्यमंत्री म्हणाले, महात्मा गांधी एक विचार आहे. ‘खेड्याकडे चला’ या त्यांनी दिलेल्या संदेशाचे आपण आज आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यांची ग्रामराज्य तसेच स्वातंत्र्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आजही गांधीजींचे विचार मार्गदर्शक ठरतात. खेड्यातील माणसाला त्याचे जीवन आनंदाने जगता यावे यासाठी खेड्यांना विकासाच्या मार्गावर नेऊन ती सक्षम आणि स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी गांधीजींच्या स्मृती जपणाऱ्या सेवाग्राममधील कर्मचाऱ्यांचे तसेच चरखागृहात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची स्क्ल्पचर उभे करणाऱ्या जे. जे. स्कुलचे कौतूक केले. कार्यक्रमादरम्यान महात्मा गांधी यांचे सेवाग्राम येथील वास्तव्य आणि येथून झालेल्या स्वातंत्र्य चळवळीबाबत तसेच सेवाग्राम विकास आराखड्यातील विकास कामांवर आधारीत तयार केलेल्या चित्रफिती दाखविण्यात आल्यात. संचालन ज्योती भगत तर आभार जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी मानले.निधीची कमतरता पडू देणार नाही : अजित पवारगांधीजींच्या पदस्पशार्ने पावन झालेल्या सेवाग्रामच्या भूमीचे पावित्र्य राखण्याचे काम आपलेच आहे. सेवाग्राम आश्रम, पवनार आश्रम आणि धाम नदीच्या सौंदर्यीकरणाचे काम करताना त्याचे पावित्र्य जपले जावे, यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. विकासाची कामे करताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी देशी झाडे लावण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. तसेच बापूंनी विचारातील स्वयंपूर्ण गावे, जलस्त्रोत आणि गावांच्या स्वच्छतेवर भर देऊन देशाची वाटचाल शाश्वत विकासाकडे झाली तर तेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.श्रेयासाठी अपूर्ण कामाचे लोकार्पण : पंकज भोयरराज्य सरकारची अस्थिर स्थिती पाहता श्रेय घेण्यासाठी गांधी जयंतीच्या निमित्ताने राज्यातील सत्ताधारी सरकारने अपूर्ण कामाचे लोकार्पण केले. ज्या कामांचे लोकार्पण झाले त्यातील एकही काम पूर्ण झाले नाही, असा आरोप आ. डॉ. पंकज भोयर यांनी केला आहे. भाजपच्या काळात तत्कालीन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सेवाग्राम विकास आराखड्याला कोट्यवधीचा निधी दिला. यातून सेवाग्राम-पवनार-वर्धा येथे अनेक विकासकामे सुरू करण्यात आली. शिवाय वेळोवेळी निधीची तरतूद करण्यात आली. परंतु, महाविकास आघाडीने या निधीला कैची लावली. यामुळे विकास कामे थांबली आहे. जे काम सुरू करण्यात आले होते, ते अपूर्ण आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सेवाग्राम ‘वर्ल्ड हेरिटेज’ व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 5:00 AM
ग्रामराज्य तसेच स्वातंत्र्याची संकल्पना अंमलात आणण्यासाठी आजही गांधीजींचे विचार मार्गदर्शक ठरतात. खेड्यातील माणसाला त्याचे जीवन आनंदाने जगता यावे यासाठी खेड्यांना विकासाच्या मार्गावर नेऊन ती सक्षम आणि स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी गांधीजींच्या स्मृती जपणाऱ्या सेवाग्राममधील कर्मचाऱ्यांचे तसेच चरखागृहात महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांची स्क्ल्पचर उभे करणाऱ्या जे. जे. स्कुलचे कौतूक केले.
ठळक मुद्देउद्धव ठाकरे : विकास आराखड्यातील कामांचा ई-श्रीगणेशा