रक्ताचं नातं असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कुणीच नाही वा नात्यातील कुणी सांभाळ करीत नाही, अशा मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्यासाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ‘घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम-जिव्हाळा, नकोत नुसती नाती’ ही नाती निभवत कुटुंबाचा सांभाळ करताना अनेकांच्या पायात आड्या पडतात. त्यात कोरोनाच्या महामारीसारखा प्रसंग ओढवला तर कर्त्या पुरुषाची पुरती दमछाक होते. पण, या महामारीच्या काळातही परप्रांतीय मजुरांची भूक भागविण्यासोबतच माता-पित्यांचे छत्र हरविलेल्या २५ मुलां-मुलींसह चार वृद्धांचा सांभाळ करीत त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी दिवस-रात्र निअस्वार्थ झटणारा अवलियाही गांधींच्या या भूमीत आहे. शिवाजी भास्करराव चौधरी, असे बाप माणसाचे नाव आहे. ते मूळचे पाचोड या गावातील असून त्यांच्यावर संतांच्या विचारांचा पगडा असल्याने समाजकार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना आर्वी नाका परिसरात दोन छोटी मुले फिरताना दिसली. त्या मुलांची चौकशी केली असता त्यांना आई-वडील नसल्याचे निदर्शनास आले. त्या दोन मुलांना घेऊन शिवाजीने वर्ध्यातील केशव सिटी परिसरात ‘आसमंत स्नेहालय’ सुरू केले. त्याला त्याचे सहकारी निखिल बुटे, प्रतिभा राऊत, नरेंद्र फुलमाळी, शरद चौधरी, भारती व पूजा यांचे सहकार्य मिळू लागल्याने स्नेहालय चांगलेच खुलू लागले. यादरम्यान पाच वर्षांपूर्वी शासकीय नोकरीत असलेल्या अमरावती येथील माधवीसोबत त्यांचा विवाह ठरला. ‘तुम्हाला अनेक जणांचा सांभाळ करावा लागेल’ असे सांगितले होते. पण, इतक्या लोकांचा सांभाळ करावा लागेल, याची दोघांनीही कल्पनाच केली नव्हती. स्नेहालयातील सदस्यांची संख्या वाढतच गेली, परिणामी, माधवीने नोकरीचा त्याग करून शिवाजीच्या खांद्यात भक्कम बळ भरले. सामाजिक कार्यक्रमातून मिळणाऱ्या पैशातून आणि सहकाऱ्यांच्या मदतीने स्नेहालयातील परिवाराचा सांभाळ शिवाजी चौधरी आणि माधवी चौधरी सध्या करीत आहेत.दोन मुलांना घेऊन तीन खोल्यांमध्ये स्नेहालयाची सुरुवात केली होती. सुरुवातीला अडचणींचा सामना करावा लागला. एकदा कणकीचे बेसण करावे लागले होते. पण, माधवीच्या त्यागाने मोठे बळ मिळाले. आता येथे २५ मुलांसह ४ वृद्धांचा सांभाळ होतो. सत्यावर माझा विश्वास असून एक व्रत म्हणून हे काम स्वीकारले आहे.-शिवाजी चौधरीसुरुवातीला चिडचिड व्हायची; पण आता सर्वांशी मने जुळली आहे. त्यामुळे प्रत्येक कामात सर्वांचे सहकार्य मिळते. माझ्या मुलांप्रमाणेच सर्वांशी नाते निर्माण झाले आहे. शिवाजींची साथ असल्याने या सेवेतच आता आमचे विश्व सामावले आहे. प्रत्येकाने नाती जपली तर येथे आश्रम निर्माण होणार नाही, स्नेहालयच कायम राहील.-माधवी चौधरी
शिवाजीच्या ‘स्नेहालया’तून अनाथांचे भावविश्व गाठतेय ‘आसमंत’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 9:20 PM
ते मूळचे पाचोड या गावातील असून त्यांच्यावर संतांच्या विचारांचा पगडा असल्याने समाजकार्यात स्वत:ला वाहून घेतले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना आर्वी नाका परिसरात दोन छोटी मुले फिरताना दिसली. त्या मुलांची चौकशी केली असता त्यांना आई-वडील नसल्याचे निदर्शनास आले. त्या दोन मुलांना घेऊन शिवाजीने वर्ध्यातील केशव सिटी परिसरात ‘आसमंत स्नेहालय’ सुरू केले.
ठळक मुद्देअबालवृद्धांच्या सेवेत समर्पित केले जीवनपत्नीने केलाय शासकीय नोकरीचा त्याग