सेवाग्रामच्या कोविड सेंटरमधून रुग्ण महिलेचे दागिने लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:02:13+5:30
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना त्यांच्या अंगावरील दागिने परत न करता, केवळ मोबाईलच परत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विलगीकरणात असलेल्या परिवाराने याप्रकरणी पोस्टाद्वारे तक्रार केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊरवाडा/आर्वी : आर्वी येथील कोरोनाबाधित महिलेला उपचाराकरिता सेवाग्राम येथील कोविड सेंटरमध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांना त्यांच्या अंगावरील दागिने परत न करता, केवळ मोबाईलच परत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विलगीकरणात असलेल्या परिवाराने याप्रकरणी पोस्टाद्वारे तक्रार केली आहे.
पुष्पा जेठानंद ठाकूर (६३) रा. आर्वी असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांना कोरोनाचे निदान झाल्याने ३० जुलैला सेवाग्राम रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान २ ऑगस्टला त्यांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाच्या परवानगीने मृतदेह घेण्याकरिता त्यांचा मुलगा सेवाग्राम रुग्णालयात गेला असता त्यांना आईच्या अंगावर सोन्याचे दागिने दिसले नाही. त्यामुळे विचारणा केली असता कर्मचाऱ्यांनी दागिने नव्हते, असे सांगून केवळ मोबाईल परत केला. वर्ध्यातील स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण, आईच्या मृत्यूमुळे शोकाकूल असलेल्या ठाकूर परिवाराने कर्मचाऱ्यांना कोणतीही विचारपूस केली नाही किंवा तत्काळ तक्रारही दाखल केली नाही. अख्खे कुटुंब विलगीकरणात असल्याने त्यांना पोलिसांत जाऊन तक्रारही करता आली नाही.
अखेर या दु:खातून सावरत मुलगा अजय जेठानंद ठाकूर यांनी याप्रकरणासंदर्भात आईच्या अंगावरील सोन्याच्या दोन बांगड्या व कानातले असा जवळपास १ लाखाचा ऐवज लंपास केल्याची पोस्टाद्वारे सेवाग्राम पोलीस ठाण्यासह मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, माजी आमदार, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. कोविड सेंटरमधील या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली असून रुग्णाच्या अंगावरील दागिने लंपास करणारा कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे आता पोलिसांसह रुग्णालय प्रशासना समोरही आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
सेवाग्राम येथील कोविड सेंटरमध्ये उपचारादरम्यान मृत पावलेल्या माझ्या आईच्या अंगावर दोन तोळ्याच्या सोन्याच्या बांगड्या व कानातले, असे एक लाख रुपयांचे दागिने होते. पण, ते आम्हाला परत न देता केवळ मोबाईल दिला. त्यामुळे आई गेल्याच्या दु: खातून सावरत याप्रकरणी पोस्टव्दारे तक्रार केली असून त्या आरोपीचा शोध घ्यावा, हिच अपेक्षा आहे.
- अजय ठाकूर, मृताचा मुलगा.
सेवाग्रामच्या कोविड सेंटरमधून मृतकाच्या अंगावरील दागिने चोरीस गेले, यासंदर्भात आम्हाला अद्याप कुठलीही तक्रार प्राप्त झाली नाही. तक्रार प्राप्त होताच तपास करुन आरोपीचा शोध घेतला जाईल.
- कांचन पांडे, ठाणेदार, सेवाग्राम.