वर्धा : खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करताना योग्य खबरदारी घेत बियाण्यांची खरेदी करावी. दुबार पेरणीत होणारा खर्च टाळण्यासाठी जमिनीत ओलावा असल्याशिवाय पेरणी करू नये. बियाण्यांच्या उगवणक्षमतेची खात्री करून पेरणी करावी, असे आवाहन अधीक्षक कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे यांनी केले.पेरणी केल्यावर बी उगवले नाही तर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. गत वर्षी याप्रकारामुळे काही शेतकऱ्यांना अतिरीक्त खर्च सहन करावा लागला होता. याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून पेरणीपूर्व मार्गदर्शन करण्यात आले. यानुसार शेतकऱ्यांनी पिकाची पेरणी उताराला आडव्या दिशेने करावी. सलग समतल पद्धतीने पेरणी करावी. बीजप्रक्रिया करताना त्यामध्ये रायझोबिय, ट्रायकोडर्मा, त्वरीत विरघळणारे जिवाणू यांचा वापर करावा. यामुळे उगवण क्षमतेत वाढ होऊन उत्पादनात वाढ होईल. तसेच पिकाची पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणी करु नये. पेरणीसाठी ६५ ते ७० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अशी माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. सोयाबीन पिकाची पेरणी करताना शक्यतो घरचेच बियाणे वापरावे, असे आवाहन केले आहे.उगवण क्षमतेची तपासणी करून बियाण्यांची पेरणी करावी. पावसातील खंडाचा पिकावर दुष्परिणाम होऊ नये, याकरिता शेतकऱ्यांनी ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा. चारा पिकांसाठी कृषी विभागामार्फत देण्यात आलेले मका बियाणे, बारमाही चारा उत्पादनासाठी तालुका बीज गुणन केंद्रावर उपलब्ध असलेल्या बारमाही गवताची लागवड करण्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी याबाबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात माहिती विचारावी. जिल्ह्यात कापूस पिकांसाठी १ हजार ३२० बेडमेकर उपलब्ध करून दिले आहेत. त्यादृष्टीने खते पेरणीद्वारे देऊन कपाशी पिकाची लागवड बेडच्या माथ्यावर न करता खालच्या बाजूने करावी. सोयाबीन पिकांसाठी जिल्ह्यामध्ये ३८० रूंदसरी वरंभा यंत्रे उपलब्ध करून दिले आहे. या यंत्राद्वारे सोयाबीनची लागवड केल्यास बियाण्यांमध्ये २५ ते ३० टक्के बचत होते. पीक संवर्धन, मुलस्थानी जलसंधारण करता येत असल्याचे सांगितले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
जमिनीत ओलावा असल्यास पेरणी करा
By admin | Published: June 11, 2015 2:05 AM