विशेष बालकांना दिलासा नव्हे, जाणीव जागृतीची गरज
By admin | Published: December 6, 2015 02:12 AM2015-12-06T02:12:03+5:302015-12-06T02:12:03+5:30
निसर्गाने अथवा अपघाताने काही उणिवा निर्माण झालेल्या या बालकांना अपंग न म्हणता विशेष बालके संबोधले पाहिजे.
वेदप्रकाश मिश्रा : जागतिक अपंग दिनी इंद्रधनुष्य कला महोत्सव
वर्धा : निसर्गाने अथवा अपघाताने काही उणिवा निर्माण झालेल्या या बालकांना अपंग न म्हणता विशेष बालके संबोधले पाहिजे. या बालकांना सहानुभूतीची नव्हे तर समानाभूतीची गरज आहे. शारीरिक उणिवा लाभलेल्या या बालकांना दिलासा नको तर त्यांच्यातील जाणिवा जागृत केल्या पाहिजे, असे प्रतिपादन दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे मुख्य सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले.
जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिनानिमित्त सावंगी येथील दत्ता मेघे सभागृहात इंद्रधनुष्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मिश्रा बोलत होते. मंचावर उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दुर्योधन चव्हाण, लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. विनोद अदलखिया, जिल्हा परिषदेचे सभापती वसंत पाचोडे, समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, विशेष कार्य अधिकारी अभ्युदय मेघे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. संदीप श्रीवास्तव, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. सी. गोयल, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, नर्सिंग समन्वयक मनीषा मेघे, प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी, डॉ. सक्सेना, अस्थिरोग विभाग प्रमुख डॉ. प्रदीप सिंग उपस्थित होते. या महोत्सवात जिल्ह्यातील विविध अपंग, अंध, मूकबधिर व मतिमंद विद्यार्थ्यांच्या शाळांतील मुलामुलींनी आपले कलागुण सादर केले. मुलांनी साकारलेल्या चित्रकृतींचे कौतुक करताना डॉ. मिश्रा म्हणाले, या बालकांची चित्रे केवळ रंग आणि रेषा नाहीत, तर त्यातून त्यांच्या भावना, कल्पना, आकांक्षा, संस्कार आणि निश्चयही व्यक्त होतो आहे.
आपल्या कार्यातील एकाग्रता या मुलांकडून शिकण्यासारखी आहे, असे स्मिता पाटील यावेळी म्हणाल्या. समारोहाच्या सुरुवातीला हेलेन केलर आणि लुईस ब्रेल यांना अभिवादन करण्यात आले. संचालन भौतिकोपचारतज्ज्ञ डॉ. माधुरी वाणे यांनी केले. आभार डॉ. सिंग यांनी मानले. यशस्वीतेकरिता रुपाली सरोदे, किरण कांबळे, माधुरी ढोरे, डॉ. सोनाली खंगार आदींनी सहकार्य केले.(शहर प्रतिनिधी)