३५ टन भंगारातून साकारला जातोय राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 08:52 PM2020-03-05T20:52:37+5:302020-03-05T20:54:49+5:30
स्क्रॅपमधून गांधीजींचा ३० फुटांचा पूर्णाकृती पुतळा निर्माणाचे काम मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे विद्यार्थी प्रा. विजय बोंदल आणि प्रा.विजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम (वर्धा) : सेवाग्राम गांधींची कर्मभूमी आणि प्रयोगभूमी राहिली आहे. बापूंनी जो विचार, कार्य दिले ते देशासाठी महत्त्वाचे होते. राष्ट्र उत्थानासोबत त्यांनी प्राधान्य दिले ते ग्रामोद्योगांना. आज जगात गांधींची जी ओळख आहे, ती प्रत्यक्ष सेवाग्राम विकास आराखड्यातून आणि तीही सेवाग्रामात साकार होताना दिसत आहे. याच कल्पनेतून स्क्रॅपमधून गांधीजींचा ३० फुटांचा पूर्णाकृती पुतळा (यात तीन फुटांचा बेस आणि २७ फुटाचा पुतळा) निर्माणाचे काम मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्चे विद्यार्थी प्रा. विजय बोंदल आणि प्रा.विजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनात होत आहे.
आचार्य विनोबा भावे हे गांधीजींचे शिष्य. यांचा पुतळा बसलेल्या स्थितीत असून १७ फूट उंचीचा आहे. दोन्ही पुतळे अण्णासागर तलावाजवळ बसविण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे या परिसराचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. गेल्या तीन महिन्यांपासून गांधी आणि विनोबा भावे यांचा सेवाग्रामातील औद्योगिक विकास महामंडळ परिसरात पुतळा तयार करण्यात येत आहे. मुंबईवरून ३५ टन चारचाकी वाहनांचे स्क्रॅप साहित्य आणल्या गेले. पुतळ्याकरिता नट, बोल्ट, स्प्रिंग, बेअरिंग, पत्रा, रॉड, इंजिनचे सुटे भाग यासह अनेक साहित्याचा वापर होत आहे. भंगार डिझेलमध्ये धुण्यात येत आहे. यामुळे ते स्वच्छ होऊन गंजणे अथवा माती लागण्याचा प्रश्न राहणार नाही. मेटलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. सेवाग्राम विकास आराखड्यातून बापूंचा विचार व कार्याला जगात पोहोचविण्यासाठी कार्याची संकल्पना तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मांडत विशेष प्रयत्न केले. सद्यस्थितीत जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या पेंटिंग तसेच शिल्प व मेटल विभागाचे पाच विद्यार्थी कार्यरत आहेत. तसेच मुंबईवरून आठवड्याला काही विद्यार्थी येतात. अशी २० ते २५ विद्याथार्ची चमू कार्यरत आहे. अण्णासागर तलाव सेवाग्रामच्या सौंदर्यात भर घालणारा आहे. मुख्य मार्गावर असल्याने दोन्ही पुतळे आणि सौंदर्यीकरण यामुळे अधिक प्रभावी वातावरण निर्माण होणार आहे. यासाठी सी. बी. सॅम्युअल, सुहास भिवनकर, स्वप्नील जगताप सहकार्य करीत आहेत.
गांधीजींचे अनेक शिल्प, पुतळे आहेत. हा पुतळा मात्र जगासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरणारा आणि एकमेव ठरला आहे. बापूंचे विचार व कार्याला साजेसा असाच असून प्रेरणा देणारा आहे. सर्व विद्यार्थी यासाठी परिश्रम घेत आहेत.
- प्रा.विजय बोंदल, विभाग प्रमुख जे.जे.स्कूल ऑफ आर्टस्, मुंबई.
पुतळा स्क्रॅमच्या सहाय्याने तयार केला जात आहे. वेल्डिंग करण्यात येत असून आहे.यासाठी वेगवेगळे रॉड वापरण्यात येत आहेत. रिपीट व नट बोल्टचा वापर नाही. याला रंग देण्यात येणार नसून केवळ वॉटर कोटिंग राहील. पावसाळ्यात गंज लागणार नाही. अत्यंत बारकाईने कॅरेक्टर तयार करायचे असल्याने स्क्रॅपचा योग्य वापर करून डिझाइन करण्यात येत आहे. तीन महिने झाले असून आणखी एक महिना लागेल. जगात वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखा ठरणारा पुतळा असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात काम करीत आहोत.
- प्रकाश गायकवाड,
विद्यार्थी जे.जे.स्कूल ऑफ आर्टस्, मुंबई.