उड्डाण पुलावर शेतकऱ्यांचा उद्रेक : रस्त्यावर तुरी फेकून नोंदविला निषेध लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : येथील बाजार समितीत शेतकऱ्यांच्या तुरी पडून असून शासनाच्या धोरणामुळे तुरीची खरेदी धोक्यात आल्याचा आरोप करीत तूर उत्पादक शेतकऱ्यांनी शुक्रवारी बजाज चौक परिसरातील उड्डाण पुलावर रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलानामुळे यवतमाळ, हिंगणघाट व अमरावती मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन शांत झाले. शासनाने तूर खरेदीला मुदतवाढ दिल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी बाजारात तूर आणली. अशात समितीच्यावतीने जागा नसल्याचे कारण काढत जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने काही दिवसांकरिता तूर खरेदी बंद केली. यातच पाऊस आल्याने बाजारात असलेली तूर ओली झाली. यामुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. सर्वत्र शेतकऱ्यांचा संप सुरू असल्याने शेतकऱ्यांनी येथे आंदोलन पुकारले. प्रारंभी बजाज चौकात सर्वांनी एकत्र येत रस्ता रोको केले. आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस ताफा घटनास्थळी दखल झाला. यावेळी ठाणेदार मदने यांनी आंदोलकांशी चर्चा करून रस्ता मोकळा करून घेतला. यामुळे वाहतूक सुरळीत झाली. दरत्यान बाजार समितीत सभापती श्याम कार्लेकर यांच्या कक्षात त्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. यावेळी जिल्हा उपनिबंधक अजय कडू, सहायक उपनिबंधक जयंत तलमले, जिल्हा कार्मेटींग अधिकारी ए.व्ही. बिसणे, सचीव समीर पेंडके व ठाणेदार चंद्रकांत मदने यांची उपस्थिती होती. यावेळी झालेल्या चर्चेअंती आंदोलकांचे समाधान झाले नाही. यामुळे आंदोलकांनी पुन्हा उड्डाण पुलावर येत बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग देशमुख यांच्या उपस्थितीत रस्त्यावर तुरी फेकून ठिय्या मांडला. यामुळे पुन्हा वाहतुकीचा खोळंबा झाला. यावर अखेर बाजार समितीने कुपण दिलेल्या व बाजाराच्या आवारात असलेली शेतकऱ्यांची तूर शनिवारी खरेदी करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली. दरम्यान रस्ता मोकळा करण्याकरिता पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत ठाण्यात नेत सोडले.
तूर खरेदीकरिता रस्ता रोको
By admin | Published: June 03, 2017 12:29 AM