समुद्रपूर : दिवसभर उन्हाचा तडाखा सुरू असताना सायंकाळी तालुक्यातील मांडगाव-धोंडगावला वादळाचा चांगलाच तडाखा बसला. रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या या वादळात मांडगाव येथील सुमारे ५० तर धोंडगाव येथे ५० च्यावर घरावरील टिनपत्रे उडाली. वादळात उडालेल्या टिनपत्र्यांमुळे दोन बैल गंभीर जखमी झाले तर रस्त्यांवरील झाडे उन्मळून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून आले व विजेच्या कडकडाटासह वादळाला सुरुवात झाली. यात धोंडगाव येथील घरांवरील छत उडून गेले. यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. यात विजेचे खांब कोलमडून पडल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. या वादळात सापडलेले दत्तप्रभु सोले यांच्या अंगावर विजेच्या तारा पडल्याने ते जखमी झाले. यावेळी विद्युत पुरवठा बंद असल्याने त्यांचा जीव बचावला. तर शत्रुघ्न भेंडारे यांच्या शेतातील गोठ्यात बांधून असलेल्या दोन बैलावर टिनपत्रे पडल्याने ते जखमी झाले. या वादळात धोंडगाव येथील बंडू थुटे, सिद्धेश्वर थुटे, चंद्रभान भोमले, विठ्ठल थुटे, कवडू मलवंडे, गोपाल बचाटे, महादेव बेदे, विनोद बवाटे, सतीश कोल्हे, माणिक मोटघरे, मधुकर भोमले यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सोबतच इतर ५० च्यावर घरांचे नुकसान झाले. वादळात सरस्वती विद्यालयाचे सुद्धा नुकसान झाले. मांडगाव येथे दुसऱ्यांदा वादळाचा तडाखा बसला आहे. यावेळी ५० च्यावर घरांचे छत उडाले आहे. यात विनायक बोरकर, गोविंदा डांगरी, प्रभाकर चंदनखेडे, रमेश पिसे, रमेश येटे यांच्यासह अनेकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धोंडगावला वादळाचा एवढा जोर होता की नागरिक वादळामुळे घरामध्ये लपण्यासाठी गेले असता घराचे छत उडल्याने जनजीवन प्रभावीत झाले होते. या नागरिकांना शासकीय मदतीची मागणी होत आहे.(तालुका प्रतिनिधी)
मांडगाव-धोंडगावला वादळाचा तडाखा
By admin | Published: May 25, 2015 2:11 AM