छात्र सैनिकांनी कळसूबाई शिखरावर फडकविला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 11:59 AM2022-11-18T11:59:00+5:302022-11-18T12:00:28+5:30
देवळीतील छात्र सैनिकांचा उपक्रमात सहभाग
वर्धा : स्थानिक २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियनअंतर्गत एसएसएनजे महाविद्यालयातील छात्र सैनिकांनी ५४०० फूट उंचीवर असलेले महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर ‘कळसूबाई’ वर १६ नोव्हेंबर रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास चढाई करून तिरंगा फडकविला.
सैनिकांना साहसी, निर्भीड व कर्तव्यदक्ष नागरिक घडविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच साहस प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून ‘ट्रेकिंग’चे प्रशिक्षण देण्यात येते. दोन दिवसीय कळसूबाई ट्रेकिंग मोहिमेची सुरुवात दि. १५ नोव्हेंबर रोजी बारी ग्राम येथून दुपारी ४ वाजता झाली. सायंकाळी शिखराजवळ पोहचून तेथे रात्रीचा मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता ‘ट्रेकिंग’ला सुरुवात करून ६ वाजता शिखरावर पोहचून छात्र सैनिकांनी तिरंगा फडकविला.
अभियानाचे आयोजन हिमगिरी ट्रेकर्स, मुंबईचे संचालक संतोष तेलंगे व सोनाली तेलंगे यांनी केले होते. कळसूबाई ट्रेक अभियान एनसीसी अधिकारी तथा रोव्हर लिडर कॅप्टन मोहन गुजरकर, वैशाली गुजरकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. अभियानात २० मुली व १४ छात्र सैनिकांनी सहभाग घेतला होता. सैनिकांचे नेतृत्व सिनिअर अंडर ऑफिसर भाविक आखूड याने, तर मुलींचे नेतृत्व अंडर ऑफिसर दीक्षिका महेशगौरी यांनी केले.
यशस्वी एनसीसी गिर्यारोहकांचे मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या नेव्हल अकादमी बोट क्लबच्या परिसरात झालेल्या समारंभात शिक्षण महाविद्यालयाचे प्रा. मुकुल भोसले, वाणिज्य विभागाचे प्रा. अशोक बोडखे व बोट क्लबचे संचालक रोशन डिखले यांनी अभिनंदन केले. यावेळी बोट क्लब, धनुर्विद्या व निशानेबाजी प्रशिक्षण केंद्रास भेट देण्यात आली.