विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:30 PM2018-02-11T22:30:49+5:302018-02-11T22:31:11+5:30
शिक्षणाने सर्वांगीण विकास होतो. विद्येची नवीन दालने आज खुली असून ज्ञानात भर पडत आहे. ज्ञानाला मर्यादा नाही. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जग मुठीत सामावले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शिक्षणाने सर्वांगीण विकास होतो. विद्येची नवीन दालने आज खुली असून ज्ञानात भर पडत आहे. ज्ञानाला मर्यादा नाही. तंत्रज्ञानाच्या क्रांतीने जग मुठीत सामावले आहे. तंत्रज्ञानामुळे सर्व सुविधा उपलब्ध झाल्यात. सर्व क्षेत्रात प्रगती होत असताना समाजसेवचे व्रत आपण विसरू नये. सामाजिक कार्य हा आपला पाया असावा. समाजात अनेक समस्या, अनिष्ट रूढी, परंपरा आहे. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत याबाबत जागृती केली पाहिजे. जनसमस्यांचे निराकरण केले तर समाज खºया अर्थाने प्रगत होईल, असे मत सिने अभिनेत्री प्राची सरकार यांनी व्यक्त केले.
बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रीकल इंजि. विभागाद्वारे विदर्भस्तरीय लघुपट स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी फिल्ममेकर रितेश वाडीभस्मे, प्रभारी प्राचार्य डॉ. एस.जी. इंगळे, विभाग प्रमुख प्रा. देवेंद्र भिंगारे, प्रा. जे.बी. फुलझेले, प्रा. एस.डी. झिलपे, भूषण कालसर्पे, प्रज्वल आवटे, आशिष चव्हाण, प्रणव तिडके, अंकीता दादुरवाडे आदी उपस्थित होते.
स्पर्धेच्या विषयावर त्या म्हणाल्या, आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून कुठलीही घटना, लिखान, व्हिडिओ चित्र लगेच व्हायरल होते. यात सत्यता किती, हा एक विषयच आहे; पण विद्यार्थ्यांनी शेतकरी आत्महत्या, व्यसन, स्त्री-भ्रूणहत्या, स्त्री-पुरुष असमानता आदी ज्वलंत विषयावर आयोजित केलेली ही स्पर्धा निश्चितच कौस्तुकास्पद आहे. चित्रीकरणातून समस्या मांडल्या गेल्या. समाजात जागृतीचे काम हे लघुपट करतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
प्राचार्य डॉ. इंगळे यांनी शेतकरी आत्महत्या, स्त्री भ्रूणहत्या या समस्या भेडसावत आहे. कारणे काहीही असली तरी शेतकरी आत्महत्या थांबावी, स्त्री-भू्रणहत्येबाबत जागृती व्हावी, या दृष्टीने लघुपटांतून विद्यार्थ्यांनी केलेले सादरीकरण समाजाकरिता संदेश आहे, असे सांगितले.
स्पर्धेत १७ लघुपटांचे सादरीकरण झाले. आशीष चव्हाण व प्रज्वल आवटे यांनी लघुपटाची रूपरेशा सादर केली. संचालन सायली ढुमणे, निकीता बाभुळकर यांनी केले तर आभार भूषण काळसर्पे यांनी मानले.
माझी कन्या प्रथम
लघुपट स्पर्धेत प्रथम पुरस्कार माझी कन्या ने तर ओझर व ओंजळ या लघुपटांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त केले. विजेत्यांना प्राची सरकार, रितेश वाडीभस्मे, डॉ. इंगळे, प्रा. भिंगारे यांच्या हस्ते रोख पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.